महाराष्ट्रशैक्षणिक

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी : आता एसटी पास थेट शाळा-महाविद्यालयांमध्येच मिळणार

मुंबई : जून महिना म्हटलं की विद्यार्थ्यांच्या शाळेच्या तयारीला वेग असतो. अनेक विद्यार्थी हे शाळेत बसने शाळेत येतात. या मुलांना बसच्या पाससाठी आता वेगळा संघर्ष करावा लागणार नसल्याचे राज्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. सोमवारपासून आता राज्यातील शाळांना सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना बसच्या पाससाठी वेगळा संघर्ष करावा लागू नये म्हणून काही महत्त्वाची पाऊलं उचलण्यात आली आहेत.

शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणा-या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.

मंत्री सरनाईक म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा १६ जूनपासून सुरू होत आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६ टक्के इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणा-या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते.

यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घेतले जात असत. आता विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा-महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचा-यांकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही.

या संदर्भात १६ जूनपासून एसटी प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणा-या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणा-या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणार आहे, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाई यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page