पुणे शहर

बारामती विमानतळावर प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात; पायलट आणि कॅडेट सुखरूप, सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह!

पुणे, महाराष्ट्र मिशन प्रतिनिधी : बारामती विमानतळावरील धावपट्टीजवळ रविवारी एक प्रशिक्षणार्थी विमान धावपट्टीबाहेर जाऊन कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुदैवाने या अपघातात पायलट आणि कॅडेट दोघेही सुखरूप बचावले असून कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, VT-SEX या प्रशिक्षण विमानातून कॅप्टन चिराग शशिकांत दोईफोडे आणि कॅडेट अभिजीत जुंद्रे हे दोघे ‘सर्किट अँड लँडिंग इमर्जन्सीज’ या विशेष प्रशिक्षणाचा सराव करत होते. सकाळी विमानाने प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते. प्रशिक्षण उड्डाणादरम्यान अचानक विमानाचा धावपट्टीवरील ताबा सुटल्याने ते धावपट्टीबाहेर गेल्याची माहिती समोर आली आहे.

सविस्तर माहितीनुसार, या प्रशिक्षण मोहिमेदरम्यान प्रथम धावपट्टी क्रमांक २९ वर आणि त्यानंतर धावपट्टी क्रमांक ११ वर ‘रिजेक्टेड टेक-ऑफ’चा सराव करण्यात येत होता. मात्र, हा सराव सुरू असताना विमान धावपट्टीवर पूर्णपणे थांबविण्यात वैमानिकाला यश आले नाही. त्यामुळे विमान धावपट्टी क्रमांक २९ च्या टोकापुढे गेले आणि उजव्या बाजूला धावपट्टीबाहेर निघून गेले. घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त परिसराची पाहणी करून विमान सुरक्षित करण्यात आले आहे.

सुरक्षेच्या मानकांवर पुन्हा सवाल

या घटनेनंतर बारामतीमधील प्रशिक्षण विमानांची देखभाल, तांत्रिक दुरुस्ती आणि तेथील सुरक्षेच्या मानकांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी या प्रकारामुळे विमानतळावरील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page