धानोऱ्याच्या आश्रमशाळेत सर्पदंशाने ३ विद्यार्थिनींचा बळी; माजी खासदार, जिल्हाध्यक्षांसह ५ जणांवर गुन्हे दाखल!
मुख्याध्यापक आणि अधीक्षक अटकेत; चौकशी समितीच्या अहवालानंतर प्रशासनाची धडक कारवाई
गडचिरोली विशेष वृत्त : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटनेत सर्पदंशामुळे तीन अल्पवयीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलत शाळेच्या मुख्याध्यापकासह एका अधीक्षकाला अटक केली आहे, तर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह एकूण पाच जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेद्वारे जपतलाई येथील ही अनुदानित आश्रमशाळा चालवली जाते. सोमवारी (दि. १०) मध्यरात्रीच्या सुमारास या आश्रमशाळेत सर्पदंश झाल्यामुळे दीपिका लकडा (वय १२ वर्षे), सुष्मिता मंडल (वय १४ वर्षे) आणि अनू कोरेटी (वय ८ वर्षे) या तीन चिमुरड्या विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. याशिवाय, दीपिका मडावी (वय ११ वर्षे), कविता किरंगे (वय १२ वर्षे) आणि समृद्धी नैताम (वय १४ वर्षे) या अन्य तीन विद्यार्थिनी आजारी पडल्या. त्यापैकी गंभीर प्रकृती असलेल्या दीपिका मडावी हिच्यावर सध्या नागपूर येथे पुढील उपचार सुरू आहेत.
कोणा-कोणावर आणि कोणते गुन्हे दाखल?
या प्रकरणाच्या चौकशीसाठी प्रशासनाकडून एक विशेष समिती नेमण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या चौकशी अहवालानंतर, सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून धानोरा पोलीस ठाण्यात खालील व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), ३(५) तसेच बाल न्याय (दुरुस्ती) अधिनियम २०१५ च्या कलम ७५ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
१. मारोतराव कोवासे (संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार व काँग्रेस नेते)
२. अॅड. विश्वजित कोवासे (संस्थेचे सचिव तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष)
३. प्रशांत ताटपल्लीवार (आश्रमशाळेचे मुख्याध्यापक)
४. भाग्यश्री चिलमवार (अधीक्षिका)
५. भास्कर भोयर (अधीक्षक)
दोन जण अटकेत
गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत रात्री उशिरा मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार आणि अधीक्षक भास्कर भोयर या दोघांना अटक केली आहे. या घटनेमुळे आदिवासी भागातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.



