पुणे शहर

प्राचार्याला खोट्या गुन्ह्याची भिती दाखवून ७ लाख उकळले

बंडगार्डन ठाण्यातील अधिकारी, दोन अंमलदारांवर गुन्हा, रिल स्टारचा समावेश

पुणे : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामंकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देवून ७ लाख रूपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी आणि दोन अंमलदार यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस अंमलदार सुदाम तायडे व महिला पोलीस अंमलदार सोनाली हिंगे यांच्यावर बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोघांनी काही जणांना गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवून पैसे उकळल्याची चर्चा सुरू आहे. पोलीस अंमलदार सोनाली हिंगे या पोलीस दलातील कर्तव्याऐवजी ‘ रिल स्टार ‘ म्हणूनही ओळख कमावत होत्या.

जुलै २०२५ मध्ये एका विद्यार्थीनीने तिची मुळ कागदपत्रे परत मिळवण्यासाठी पोलीसांकडे धाव घेतली होती. नियमानुसार प्रक्रिया सुरू असताना, संबंधित तपास अधिकाऱ्यांनी प्राचार्यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे खोटे आरोप केले. विद्यार्थीनी अल्पवयीन असल्याचे सांगून प्राचार्यावर ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई करण्याची आणि संस्थेची प्रतिमा मलीन करण्याची भिती दाखविली. संस्थेची बदनामी आणि अटक टाळण्यासाठी संबंधितांनी १० लाख रुपयांची मागणी केली. अखेर तडजोडी अंती ७ लाख रुपये देण्याचे ठरले.

२८ जुलै २०२५ रोजी ही रक्कम कॉलेजमधील एका कर्मचाऱ्यामार्फत आरोपींपर्यंत पोहोचविण्यात आली. घडलेल्या चुकीच्या प्रकाराबाबत पीडित मुलीने आपल्या पालकांसोबत पोलीस आयुक्तालयात तक्रार केली. पीडित मुलीने केलेल्या तक्रारीच्या चौकशीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी तरुणीला घाबरवून व संगनमत करुन हा बनाव रचला असल्याचे व खोटया गुन्ह्याचा धाक दाखवून जाणीवपूर्वक ही खंडणी वसूल केल्याचे समोर आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, आश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट २ व पोलीस अंमलदार गणेश ढगे, साधना पवार, महेश पाटील, अमित गद्रे, शंकर नेवसे, यांनी सहभाग घेतला.

चौकट 👇 👇 👇 👇 👇 👇 👇 👇

🔴सहा पोलिस कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई होणार🔴

शहर पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या सहा पोलिस कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
प्राचार्यांना पोक्सोअंतर्गत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून सात लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, रिलस्टार सोनाली हिंगे आणि पोलिस कर्मचारी सुदाम तायडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले असून, त्यांच्या कृत्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा धुळीस मिळाल्याचा ठपका ठेवत आता त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page