नाशिकमधील आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक व मानसिक शोषण
तरुण कर्मचाऱ्याचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न

नाशिक : नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक व मानसिक शोषण आणि तरुण कर्मचाऱ्याचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. आठ महिला तर एका तरुणाने तक्रार दिली आहे.
या घटनेची माहिती सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली. या २०२२ ते २०२६ या कालावधीत हे गुन्हे घडले. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सहायक आयुक्त (गुन्हे) यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक अर्थात ‘एसआयटी’ची स्थापना केली आहे.
जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील तीन सहकाऱ्यांनी पीडितेला धार्मिकतेबद्दल आक्षेपार्ह बोलून दुखावले तर एका संशयिताने लग्नाचे वचन देऊन पीडितेसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तसेच अन्य एकाने कार्यालयात, जिन्यात पकडून पीडितेशी लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
२०२२ ते २०२६ या काळात आरोपींनी महिला सहकाऱ्यांच्या वैयक्तिक वैवाहिक आयुष्याबाबत लज्जास्पद टिप्पणी करत चुकीचा स्पर्श केला आणि पीडितेकडे रोखून पाहात जवळीक साधण्याच्या प्रयत्न केला. खासगी आयुष्याविषयी लज्जास्पद गोष्टी विचारत गैरवर्तन केले.
तसेच २०२२ ते २३ मार्च २०२६ दरम्यान बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या तीन संशयितांनी विशिष्ट धर्माविषयी आक्षेपार्ह बोलून तरुणाला त्यांच्या धर्माची प्रार्थना करायला भाग पाडत धर्माचा अपमान केला. तक्रारदाराला बळजबरीने मांसाहार सेवन करायला लावून त्याचे धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
- या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून नाशिक पोलिसांच्या तपासावर त्यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, “हे अतिशय गंभीर प्रकरण असून पोलिसांनी ते उघडकीस आणले आहे. आयटी कंपनीत दबाव आणून धर्मांतर आणि लैंगिक शोषण केले, ते अतिशय धक्कादायक आहे. मी पोलिसांचे कौतुक करेन की त्यांनी वेगाने कारवाई करत याचा भांडाफोड केला.”



