पुणे शहर

विश्रांतवाडी परिसरात अवैध धंद्यांची भरली मंडई! ७/८ जुगार अड्ड्यांमुळे सामान्यांना वाढता उपद्रव ; कारवाईच्या नाटकानंतर पुन्हा अड्ड्यांवर गजबज

पुणे : कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच! अशी परिस्थिती जुगार अड्ड्यांची आहे. विश्रांतवाडी परिसरात एक दोन नव्हे तर ७/८ जुगार अड्डे मागील अनेक महिन्यांपासून सुरू असून त्यांच्यावर देखाव्यापुरती कारवाई होते आणि काही दिवसांनी वातावरण निवळले की पुन्हा हे अड्डे डोकी वर काढतात. लोक लाखो रुपये हरतात आणि व्यसनात बुडून कर्जबाजारी होतात, तरीही अड्डे सुरू राहतात. चालू काळात पुणे शहरात गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे अवैध धंद्यांना ऊत आला आहे. विश्रांतवाडी हद्दीत गस्त सुरू असूनही किंवा विशेष शाखेचे पोलीस असूनही त्यांना या जुगार अड्डा साखळीची माहिती कशी होत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत असून संबंधित वरिष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जाते.

विश्रांतवाडी परिसरात एक दोन नव्हे तर ७/८ जुगार अड्डे सुरू आहेत. विश्रांतवाडीतील मटका किंग बंटी व त्याचा साथीदार मिळून एकत्रित मोठे ३ मटका जुगार अड्डे चालवत आहेत. एक कळस मध्ये तर दुसरा गांधी नगर आणि तिसरा वजरेश्वरी मंदिरा शेजारी आहे. मटका किंग बंटी याला व त्याच्या साथीदारांना पकडून धिंड काढण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हे शाखेला दिले होते. कठोर कारवाई होऊनही बंटी खुलेआम जुगार अड्डे चालवत असून स्थानिक पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे.

भिमनगर झोपडपट्टी, लक्ष्मी माता मंदिर परिसर, एकता नगर झोपडपट्टी, टँक रोड शांती नगर, धानोरी येथे भारत ढाब्याच्या जवळ, वडार वस्ती अशा ठिकाणी जुगार अड्ड्यांची जत्रा पाहायला मिळते. चणे- फुटाण्याच्या पुड्या ज्या सहजपणे जागोजागी मिळतात तशा गांजाच्या पुड्या मिळत असल्याने कुमारवयीन आणि तरुण मुलांसह अनेक जण नशेच्या विळख्यात सापडले असून त्यांच्याकडून कळत नकळत सामान्य नागरिकांना उपद्रव वाढत असल्याने एकूण गुन्हेगारीत वाढ झाली आहे.

मध्यंतरी एका पत्र्याच्या शेडमध्ये तर २० ते ३० सामान्य, गरीब लोकांची गर्दी दिसून आली. या अड्ड्यांकडे स्थानिक पोलिसच नाही तर मोठमोठ्या गुन्ह्यांची उकल करणाऱ्या गुन्हे शाखेचे सुध्दा दुर्लक्ष आहे. कधी कधी लोकांवर उपकार म्हणून कारवाई होऊनही अवैध धंदे सुरू ठेवण्याचे धाडस गुन्हेगारांमध्ये आलेले दिसते. पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसुली करणारे पोलीस कर्मचारी हे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुध्दा त्यांना फूस देण्यासाठी तयारच असतात. या अड्ड्यांविषयी फारच तक्रारी झाल्या की ते देखाव्यासाठी बंद पाडले जातात, किंवा तसे नाटक केले जाते.

अंमली पदार्थांच्या ‘मंडई’कडे डोळेझाक

मध्यंतरी दौंड तालुक्यातील कुरकुंभ मध्ये एका औद्योगिक शेड मध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ पोलिसांना आढळून आले होते. या ठिकाणी तयार झालेले अंमली पदार्थ विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत विकले जाताना आढळून आले होते. इतका गंभीर प्रकार घडूनही बधीर मनाने संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी विश्रांतवाडी परिसरातील जुगार अड्ड्यांसह अंमली पदार्थांच्या मंडईकडे डोळेझाक करत असल्याचे दिसून येते.

पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी ‘ड्रग्जमुक्त प्रभाग’ (Drug-Free Ward) ही विशेष मोहीम एप्रिल २०२६ मध्ये सुरू केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबवण्यात येत असून, शहरात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीला आणि वापराला आळा घालणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

ही केवळ पोलिसांची मोहीम नसून यात सर्व पुणेकरांच्या सक्रिय सहभागावर भर दिला जात आहे. संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विश्रांतवाडी परिसरात अमली पदार्थांच्या वाढत्या उपद्रवाचा मुकाबला करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही मोहीम विश्रांतवाडी परिसरात प्रभावीपणे राबवावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page