८० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला पकडले

पुणे: ८० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. लोहगाव पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक मनोज मधुकर बस्टे (वय ३८, रा. गंगा कळस सोसायटी, कळस, धानोरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत एका ३९ वर्षाच्या नागरिकाने तक्रार दिली आहे. तक्रारदार यांचा जमिनीचा व्यवसाय असून लोहगाव पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. या अदखलपात्र गुन्ह्यात मदत केली म्हणून व पुढे भविष्यात मदत करण्यासाठी बस्टे याने तक्रारदार यांच्याकडे ७० हजार रुपयांची लाचेची मागणी केली.
त्याची तक्रार ३० एप्रिल २०२६ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. या तक्रारीची पडताळणी ३० एप्रिल रोजी पंचासमक्ष करण्यात आली. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक बस्टे याने त्यांच्याकडे स्वत:साठी व वरिष्ठांसाठी ८० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर १ मे २०२६ रोजी सायंकाळी लोहगाव पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून ८० हजार रुपये स्वीकारताना बस्टे याला पकडण्यात आले.
लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पोलीस उपनिरीक्षक मनोज बस्टे याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस आयुक्त अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर व सहकारी यांनी केली़ पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे तपास करीत आहेत.


