पुणे जिल्ह्यात ३ धक्कादायक घटना; नसरापूर मध्ये बालिकेवर बलात्कार व खून
चाकणमध्ये बालकाचा खून, हिंजवडीत सुरक्षारक्षक अटकेत

मुंबई/ पुणे : जिल्ह्यात अल्पवयीनांवरील गुन्ह्यांच्या ३ गंभीर घटनांनी खळबळ उडाली आहे. भोर-नसरापूर येथील साडे तीन वर्षाच्या चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्याविषयी प्रचंड संताप निर्माण झाला आहे. चाकणजवळील दक्षिण महाळुंगे येथे तीन वर्षांच्या मुलाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे, तर हिंजवडी परिसरात एका सुरक्षारक्षकाला लैंगिक चाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
भोर-नसरापूर येथील साडे तीन वर्षाच्या चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच आरोपीवरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याला तत्काळ फाशी व्हावी यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करावेत असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांना दिले आहेत.
पुणे जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या घटनेचे अतिशय तीव्र पडसाद भोर आणि नसरापूर परिसरात उमटले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पुणे बंगळुरू हायवेवर रास्ता रोको केला आहे. या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गंभीर दखल घेतली. तर उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही तत्काळ पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप गिल यांच्याशी फोनवरून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या घटनेतील आरोपीने यापूर्वीही असाच गुन्हा केला असून आता अशा नराधमाला जगण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यामुळे त्याच्यावर कठोर कलमे लावून त्याला फासावर चढवण्याची तजवीज करावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील राहील असेही सांगितले आहे. या आरोपीवरील खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडित मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून दिला जाईल असेही शिंदे यांनी आश्वस्त केले आहे.
दक्षिण महाळुंगे येथे तीन वर्षांच्या बालकाचा खून
दरम्या, मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण महाळुंगे (चाकण) येथे राहणाऱ्या तीन वर्षांच्या मुलाला अज्ञात व्यक्तीने घराजवळून फूस लावून बंद खोलीत नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा गळा चिरून खून करण्यात आला. मुलाचा मृतदेह लेबर कॅम्पमधील एका खोलीत आढळून आला. औद्योगिक क्षेत्रातील खालुंबे (ता. खेड) येथून ही अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली.
सोळा वर्षीय मुलाकडून केवळ तीन वर्षांच्या निष्पाप बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मृत मुलगा परराज्यातून कामासाठी आलेल्या आई व काकासोबत राहत होता. यावरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पीडित चिमुकला आपल्या घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. बराच वेळ तो परत न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र काहीच सुगावा न लागल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. मात्र, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला बेड्या ठोकत मोठे यश मिळवले.
हिंजवडीत सुरक्षारक्षक अटकेत
दरम्यान, आयटी पार्क हिंजवडी फेज २ मधील एका सोसायटीत खेळणाऱ्या नऊ वर्षीय दोन मुलींना बोलावून त्यातील एका मुलीशी लैंगिक चाळे केल्याप्रकरणी सुरक्षारक्षक विजय मधुकर चव्हाण (वय २४, मूळ रा. यवतमाळ) याला अटक करण्यात आली आहे.
बुधवारी संध्याकाळी हा प्रकार घडला असून, तक्रारीनंतर मध्यरात्री गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
या तीन घटनांमुळे पालकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अल्पवयीनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.


