अजित पवारांकडून स्वबळाचे संकेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुणे जिल्ह्याची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
सर्वच राजकीय पक्षांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीमध्ये महायुती एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेतही दिले आहेत. मात्र महाविकास आघाडी स्वतंत्र लढणार असल्याचेच मानले जात आहे. त्यातच आता महायुतीमध्ये देखील सर्वच घटक पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुण्यात स्वबळावर लढणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी या बैठकीत दिले आहेत.
चार महिन्यांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. प्रशासकीय आणि राजकीय नियोजनानुसार तीन टप्प्यांत निवडणूक घेण्याचे नियोजन होत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले होते. राज्यातील २९ मनपा, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद आणि २८८ पंचायत समित्यांसाठी ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होतील, अशी शक्यता आहे. महिनाभरापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिका, जिल्हा परिषदांना एक पत्र पाठवले होते. त्यात ४० दिवसांत म्हणजे जून अखेरपर्यंत वॉर्ड, प्रभाग तसेच गण, गट रचना करून घेण्याचे आदेश दिले आहेत.
काँग्रेसची स्वबळाची तयारी : नाना पटोले
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संदर्भात सर्वच पक्ष स्वबळावर तयारी करत असतात. तशी काँग्रेस पक्षाची देखील तयारी असल्याचे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील म्हटले होते. इतकेच नाही तर महाविकास आघाडीमध्ये नवीन घटक पक्ष म्हणजेच मनसेला घेण्यासंदर्भात हाय कमांड निर्णय घेतील असे देखील त्यांनी म्हटले आहे.



