NEET पेपर फुटीचा तपास सुसाट! सीबीआयकडून देशभरात १४ ठिकाणी छापे, महाराष्ट्र कनेक्शन पुन्हा एकदा उघड

नवी दिल्ली/पुणे : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET-UG 2026) मधील कथित पेपर फुटी आणि गैरव्यवहाराच्या तपासाला आता वेग आला आहे. गेल्या २४ तासांत केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) देशभरात १४ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही अटक करण्यात आलेल्या व्यक्ती महाराष्ट्रातील आहेत.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ताज्या कारवाईत महाराष्ट्रातील पुणे येथून मनिषा वाघमारे आणि अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) येथून धनंजय लोकंडा यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता सातवर पोहोचली आहे. यापूर्वी जयपूर, गुरुग्राम आणि नाशिक येथून ५ जणांना अटक करण्यात आली होती.
देशभरात १४ ठिकाणी सर्च ऑपरेशन
सीबीआयने मागील २४ तासांत दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये एकूण १४ ठिकाणी शोधमोहीम राबवली. या छापेमारी दरम्यान अनेक संशयास्पद कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि मोबाईल फोन्स जप्त करण्यात आले आहेत. पेपर वितरणाचे जाळे नेमके कुठपर्यंत पसरले आहे, याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण केले जात आहे.
२१ जून रोजी होणार फेरपरीक्षा
एकीकडे सीबीआयचा तपास सुरू असतानाच, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) रद्द झालेली NEET-UG 2026 परीक्षा आता २१ जून २०२६ रोजी घेण्याचे जाहीर केले आहे. सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे पुन्हा एकदा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
गुन्ह्याचे स्वरूप
सीबीआयने या प्रकरणात गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, पुराव्यांचा नाश करणे आणि ‘सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) कायदा २०२४’ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणाचा मूळ स्त्रोत शोधण्यासाठी सीबीआय आता राजस्थान पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपसोबत (SOG) समन्वय साधत आहे.
या प्रकरणाचा तपास आता पुणे आणि नाशिक अशा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांभोवती फिरत असल्याने राज्यातील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.



