शिक्षण माफियांची खैर नाही! विद्यार्थ्यांच्या हितासाठी NEET-UG फेरपरीक्षेचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या NEET-UG परीक्षेबाबत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली की, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) या परीक्षेसाठी नवीन तारीख जाहीर केली असून, आता २१ जून रोजी ही फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.
शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही परीक्षा गेल्या ३ मे रोजी पार पडली होती. मात्र, ७ मे पर्यंत NTA च्या तक्रार निवारण प्रणालीकडे अनेक आक्षेप नोंदवण्यात आले. काही कथित ‘गेस पेपर्स’मधील प्रश्न मुख्य परीक्षेतही आल्याचे समोर आले होते. या गंभीर बाबीची दखल घेत उच्च शिक्षण विभाग आणि सरकारने प्राथमिक चौकशी सुरू केली. त्यानंतर हे प्रकरण केंद्र सरकारच्या संबंधित तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांचे हित सर्वोच्च
धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले की, “विद्यार्थ्यांचे भविष्य आणि त्यांचे परिश्रम हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कोणत्याही पात्र विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये आणि ‘शिक्षण माफियां’मुळे किंवा चुकीच्या मार्गाचा अवलंब केल्यामुळे कोणाही अपात्र उमेदवाराला याचा फायदा मिळू नये, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मनात असलेली संभ्रमावस्था आता दूर झाली असून, त्यांना पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.



