पुणे शहर

पुणे-सातारा रोडवरील ‘द्वारका लॉजिंग’वर छापा; ४ मुलींची सुटका, लातूरच्या एजंटला बेड्या!

पुणे : पुणे शहरात अनैतिक मानवी वाहतूक आणि देहविक्री व्यवसायाविरुद्ध पुणे पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली आहे. पुणे-सातारा रोडवरील आंबेगाव बुद्रुक येथील “द्वारका लॉजिंग अँड बोर्डिंग” येथे सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) छापा टाकून चार पीडित महिलांची सुटका केली. या कारवाईत एका एजंटला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आंबेगाव बुद्रुक परिसरातील द्वारका लॉजिंगमध्ये काही महिलांकडून जबरदस्तीने देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या माहितीची शहानिशा करण्यासाठी एक बनावट ग्राहक (Dummy Customer) त्या ठिकाणी पाठवला. बातमीची खात्री पटताच, पोलिसांनी ११ मे २०२६ रोजी या ठिकाणी अचानक छापा टाकला.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी ४ पीडित महिलांची सुटका केली. या व्यवसायाचा मुख्य सूत्रधार आणि एजंट सचिन बाबुराव गायकवाड (वय २८, रा. पानसरे नगर, कोंढवा, पुणे; मूळ रा. लातूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १४३ (१) (३), ३ (५) आणि अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) विवेक मासाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उपनिरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार आंधळे, भिवरकर, केदार, कोंडे तसेच महिला पोलीस अंमलदार खेडेकर आणि इंगळे यांचा समावेश होता. या कारवाईमुळे पुणे-सातारा रोड परिसरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page