पुणे शहर

धक्कादायक! ‘मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय चालतो’ अशी धमकी देऊन २ लाखांची खंडणी उकळणारी ५ जणांची टोळी जेरबंद; खराडी पोलिसांची मोठी कारवाई!

पुणे (प्रतिनिधी) : खराडी येथील एका नामांकित स्पामध्ये घुसून, ‘येथे वेश्याव्यवसाय चालतो’ असा खोटा आरोप करत आणि पोलीस केस करण्याची धमकी देऊन चालढकल करत लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीचा खराडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी ३ पुरुष आणि २ महिला अशा एकूण ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, माननीय न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १३ मे २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजताच्या सुमारास खराडी येथील ‘सिटी व्हिस्टा बिल्डिंग’मधील ‘फिल टच स्पा’मध्ये ३ अनोळखी पुरुष आणि २ अनोळखी महिला जबरदस्तीने घुसल्या. त्यांनी स्पा चालवणाऱ्या फिर्यादी यांना “तुमच्या स्पामध्ये वेश्याव्यवसाय चालतो” असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसेच, पोलीस केस न करण्यासाठी सुरुवातीला २ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. फिर्यादीने नकार दिला असता त्यांना मारहाण करण्यात आली. शेवटी १.५ लाख रुपयांवर तडजोड झाली, ज्यापैकी ३० हजार रुपये आरोपींनी ऑनलाइन स्वरूपात त्वरित उकळले. उर्वरित रक्कम न दिल्यास खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकीही त्यांनी दिली.

या प्रकारानंतर फिर्यादी यांनी खराडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी १४ मे २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(२), ३०८(३), ३०८(७), ११५(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ७) श्री. सोमय मुंडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. चंद्रसेन पालकर यांनी तपासासाठी दोन पथके तयार केली.

सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे आणि पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे यांच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केसनंद फाटा, वाघोली येथे रात्रीच्या वेळी सापळा रचून मुख्य आरोपी प्रतीक जयवंत गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता इतर सहकाऱ्यांची नावे समोर आली.

प्रतीक जयवंत गायकवाड (वय ३१, रा. केसनंद), विशाल साळवे (रा. विश्रांतवाडी, येरवडा), रोहित मांदरे (रा. येरवडा), छाया सुखदेव कांबळे (वय ४०, रा. येरवडा – स्वतःला सामाजिक कार्यकर्त्या म्हणवून घेणारी) सुनिता संजय लोंढे (वय ४३, रा. वडगाव शेरी – सुरक्षा रक्षक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात उकळलेली रोकड ३०,००० रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली एक होंडा ॲक्टिव्हा दुचाकी (एकूण किंमत रु. ७०,०००/-) हस्तगत केली आहे.

सदरची धडक कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोजकुमार पाटील, डीसीपी सोमय मुंडे, एसीपी नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रसेन पालकर, एपीआय रवींद्र गोडसे, पीएसआय राहुल कोळपे आणि अंमलदार मनोज खरपुडे, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, साहेबराव गुंडाळे, अशोक केदार, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव व विलास केदारी यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page