पुणे शहर

आम आदमी पार्टीच्या वतीने महानगरपालिकेच्या समोर बैलगाडी आंदोलन 

सरकारी पैशाची उधळपट्टी थांबवण्यासाठी आवाहन

पुणे : पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी विरोधात महागाई व बेरोजगारीच्या विरोधात सोमवारी पुण्यामध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने अभिनव बैलगाडी आंदोलन करण्यात आले. आम आदमी पार्टीच्या शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयापासून ते पुणे महानगरपालिका इमारतीपर्यंत हा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी “पेट्रोलचे भाव कधी कमी होणार ? मेलोडी खावो, खुद जान जाओ”, “डिझेलचे भाव कधी कमी होणार? मेलोडी खावो, खुद जान जाओ”, “गॅसचे भाव कधी कमी होणार ? मेलोडी खावो, खुद जान जाओ”, “महागाई कधी कमी होणार ? मेलोडी खावो, खुद जान जाओ” अशा घोषणांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मोदींनी संपूर्ण देशाला तयार करण्याचे मेलडी चॉकलेट दिले आहे. त्यागाचा सर्व बोजा सर्वसामान्य जनतेवर सोपवून केवळ एक दिवसाच्या साधेपणाचा आव सत्ताधाऱ्यांनी रील द्वारे आणलेला दिसला. केवळ एक दिवस बुलेट अथवा टू व्हीलर वर फिरून आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा आहे तसा आपला लवाजमा, वाहनांचा ताफा, बडेजाव करत फिरणाऱ्या देवेंद्र फडणवीस व सत्ताधाऱ्यांनी नरेंद्र मोदी यांच्या आव्हानातील गांभीर्य काढून घेतले. दोन दिवसांची चमकोगिरी आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती दिसत आहे ! ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण’ या सत्ताधाऱ्यांच्या वृत्तीला सामान्य जनता उबली आहे, असे आंदोलकांचे म्हणणे होते.

सरकारी पैशाची उधळपट्टी थांबवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने स्वतः पासून सुरुवात करावी अशी मागणी करत ७ “प्रति- आवाहन” देण्यात आले.

१. शासकीय उत्सवांवरील, उद्घाटने व भूमिपूजन सोहळ्यांवरील उधळपट्टी थांबवा: पुढील १ वर्ष कोणतेही अनावश्यक व भव्य शासकीय सोहळे, उद्घाटन कार्यक्रम, भूमिपूजन कार्यक्रम साजरे करणे बंद करा. ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन व उद्घाटनाचे कार्यक्रम आयोजित करा.

२. साधेपणाचा अवलंब: सर्व शासकीय कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने आणि कमीत कमी खर्चात पार पाडावेत. महापौर, नगरसेवक, वरिष्ठ अधिकारी यांच्या दालनांच्या सजावटीवर होणारा खर्च तात्काळ थांबवा.

३. वेतन आणि पेन्शनचा त्याग: प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भाजपच्या सर्व महापौर, नगरसेवक यांनी स्वेच्छेने १ वर्षासाठी आपले वेतन आणि भत्ते (Perks) सोडून द्यावेत.

४. भव्य रॅलींवर बंदी: शक्ती प्रदर्शनासाठी आणि भव्य रॅलींसाठी होणारा अवाढव्य खर्च थांबवून तो पैसा लोककल्याणासाठी वापरावा.

५. विदेशी दौरे रद्द करा: जोपर्यंत अत्यंत आवश्यक नसेल, तोपर्यंत सरकारी खर्चाने होणारे विदेशी अभ्यास दौरे आणि मोठमोठी शिष्टमंडळे पाठवणे बंद करावे.

६. VIP संस्कृतीचा अंत, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसाठी वाहन खरेदी थांबवा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर: पुढील १ वर्ष सर्व व्ही.आय.पी. कॉन्व्हॉय (ताफा) आणि लक्झरी सरकारी गाड्यांचा वापर थांबवावा. त्याऐवजी सार्वजनिक वाहतूक, सायकल किंवा ‘कार पूलिंग’चा वापर करावा. तसेच १ वर्ष कोणत्याही नवीन सरकारी गाड्यांची खरेदी करू नये. सरकारी आस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा याचे काटेकोर पालन करावे.

७. भ्रष्टाचारमुक्त वर्ष: किमान १ वर्ष तरी प्रशासनातून भ्रष्टाचार पूर्णपणे हद्दपार करण्याची शपथ घेऊन ती पाळावी आणि सर्वसामान्य त्रस्त नागरिकांना प्रशासकीय सेवा तात्काळ देऊन दिलासा द्यावा. भ्रष्ट अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याची कारवाई करावी.

यावेळी विजय कुंभार (प्रदेश उपाध्यक्ष), डॉ अभिजीत मोरे (प्रदेश सचिव), अमित म्हस्के (प्रदेश समन्वयक), मुकुंद किर्दत (प्रदेश प्रवक्ते), रविराज काळे (प्रदेश युवा अध्यक्ष), संजय कोने (प्रदेश संघटक – कामगार आघाडी), सुदर्शन जगदाळे ( पुणे शहर अध्यक्ष), धनंजय बेनकर (पुणे शहर अध्यक्ष), सुभाष कारंडे (पुणे शहर महासचिव), सतीश यादव (पुणे शहर सचिव), ऋषिकेश कनवटे (प्रदेश युवा आघाडीडी उपाध्यक्ष), एडवोकेट गणेश थरकुडे, विकी पासोटे, शुभम चव्हाण, ऋषिकेश मारणे व इतर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page