राष्ट्रीय

अहमदाबाद हादरले! बँक ऑफ बडोदाच्या ‘आरबीआय करन्सी चेस्ट’मधून ८.७० कोटींची रोकड लंपास; १५ वर्षांचा जुना कस्टोडियनच निघाला मास्टरमाइंड!

अहमदाबाद : अहमदाबादमधील गांधी रोड येथील बँक ऑफ बडोदाच्या ‘आरबीआय करन्सी चेस्ट’मधून (RBI Currency Chest) तब्बल ८ कोटी ७० लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या हाय-प्रोफाइल चोरीचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आज समोर आले असून, याप्रकरणी बँकेत तब्बल १५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या संयुक्त कस्टोडियनला (Joint Custodian) मुख्य आरोपी म्हणून नामोनिर्दिष्ट करण्यात आले आहे.

भंगाराच्या नावाखाली कोट्यवधींची रोकड बाहेर काढली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरसिद्ध कडियार असे मुख्य संशयित आरोपीचे नाव आहे. १३ जानेवारी २०२६ च्या रात्री कडियार याने अत्यंत हुशारीने या चोरीला अंजाम दिला. बँकेची सुरक्षा व्यवस्था भेदण्यासाठी त्याने सुरक्षारक्षकांना ‘पेटीत भंगार सामान असून ते बाहेर टाकायचे आहे’ असे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात त्या पेटीत भंगाराऐवजी ८.७० कोटी रुपयांची रोख रक्कम भरलेली होती. कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या करन्सी चेस्टधून तो ही पेटी घेऊन सहज बाहेर पडला.

९० दिवसांचा ‘तो’ गैरसमज आणि आरोपी अडकला!

या चोरीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, चोरी केल्यानंतरही आरोपी कडियार हा तब्बल तीन महिने अत्यंत सामान्यपणे बँकेत कामावर येत होता. बँकेतील सीसीटीव्ही फुटेज ९० दिवसांनंतर आपोआप डिलीट (Auto-delete) होते, असा कडियारचा ठाम समज होता. त्यामुळे तीन महिने उलटले की आपण सुरक्षित राहू, या भ्रमात तो वावरत होता. मात्र, पोलिसांच्या तपासात हे फुटेज सुरक्षितपणे हस्तगत करण्यात आले असून, हेच फुटेज आता या प्रकरणातील सर्वात मोठा आणि भक्कम पुरावा ठरले आहे.

आलिशान जीवनशैलीची हाव

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हरसिद्ध कडियार याला अत्यंत आलिशान आणि सुखासीन जीवनशैली जगण्याची हाव होती. याच अवाजवी मोहापायी त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

याप्रकरणी पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चक्राView वेगाने फिरवली जात आहेत. कडियारने ही चोरी एकट्याने केली की बँकेतील किंवा बँकेबाहेरील इतर काही साथीदार यात सामील आहेत? तसेच चोरलेली कोट्यवधींची रक्कम सध्या कुठे लपवून ठेवली आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत. या धाडसी चोरीमुळे बँकिंग क्षेत्रात आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page