नवी दिल्ली

CBI ॲक्शन मोडमध्ये! नीट घोटाळ्यात अडकलेल्या प्राध्यापक मनिषा हवालदार यांच्या कोठडीत ६ दिवसांची वाढ

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता अधिक तीव्र झाला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्राध्यापक मनिषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं सहा दिवसांची सीबीआय (CBI) कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे आता या घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार आणि धागेदोरे समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मनिषा हवालदार यांना न्यायालयात हजर केले असता, सीबीआयच्या वतीने या रॅकेटच्या सखोल चौकशीसाठी कोठडीची मागणी करण्यात आली. पेपर लीक प्रकरणातील गुप्त माहिती मिळवणे, पैशांची देवाणघेवाण आणि या गुन्ह्यात सामील असलेल्या इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी आरोपीची कोठडीत चौकशी करणे अत्यंत गरजेचे असल्याचा युक्तिवाद सीबीआयने केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मनिषा हवालदार यांना ६ दिवसांची सीबीआय कोठडी मंजूर केली.

घोटाळ्याचे धागेदोरे शोधण्याचे सीबीआयसमोर आव्हान

प्राध्यापक मनिषा हवालदार यांच्या सीबीआय कोठडीमुळे आता तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. पुढील ६ दिवसांत सीबीआय त्यांच्याकडे खालील मुद्द्यांवर कसून चौकशी करणार आहे. पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये त्यांचे नेमके काय स्थान होते? त्यांच्यापर्यंत नीट परीक्षेची गोपनीय माहिती किंवा प्रश्नपत्रिका कशी पोहोचली? या व्यवहारात कोट्यवधी रुपयांची जी देवाणघेवाण झाली, त्यात कोणाकोणाचा सहभाग आहे? या रॅकेटचे जाळे इतर कोणत्या राज्यांत किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये पसरले आहे का?

विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष तपासाकडे

NEET परीक्षेतील या मोठ्या गैरप्रकारामुळे आणि पेपरफुटीमुळे देशभरातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआय करत असलेल्या या धडक कारवाईकडे आणि मनिषा हवालदार यांच्या चौकशीतून पुढे येणाऱ्या धक्कादायक खुलाश्यांकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page