महाराष्ट्र

मिरा रोडमध्ये ‘बकरी विरुद्ध डुक्कर’ संघर्ष; पूनम क्लस्टर सोसायटीत हायव्होल्टेज ड्रामा, पोलिसांनी परिस्थिती टोकाची होण्यापासून रोखली!

मिरा रोड: मिरा रोड येथील पूनम क्लस्टर या उच्चभ्रू गृहसंकुलात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर दोन गटांत सुरू असलेला वाद मंगळवारी अत्यंत टोकाचा आणि संवेदनशील वळणावर पोहोचला. सोसायटीत आणलेल्या बकऱ्यांना बाहेर काढण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मंगळवारी थेट तीन डुक्कर गृहसंकुलाच्या परिसरात आणल्याने परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला. या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत डुकरांना ताब्यात घेतले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

वादाची पार्श्वभूमी आणि ब्लेड हल्ला

पूनम क्लस्टर गृहसंकुलात विविध धर्मीय नागरिक राहतात. दोन दिवसांपूर्वी काही रहिवाशांनी बकरी ईदसाठी संकुलात बकऱ्या आणल्या होत्या. याला इतर काही रहिवाशांनी तीव्र आक्षेप घेतला. या वादातून सोमवारी रात्री हिंदुत्ववादी संघटनांनी सोसायटीबाहेर जोरदार आंदोलन केले. यादरम्यान एका मुस्लिम व्यक्तीसोबत आंदोलनकर्त्यांची बाचाबाची झाली आणि त्या व्यक्तीने ब्लेडने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांनी वेळीच त्या व्यक्तीला ताब्यात घेतल्याने रात्रीचा तणाव निवला होता.

मंगळवारी ‘डुकरां’मुळे वाद पुन्हा पेटला

सोमवारच्या घटनेनंतर मंगळवारी सकाळपासूनच सोसायटी परिसरात पुन्हा कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली. संकुलातील बकऱ्या त्वरित बाहेर काढण्याची मागणी करत कार्यकर्ते आक्रमक झाले. आंदोलकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत हनुमान चालीसा पठण सुरू केले. मात्र, याच दरम्यान काही कार्यकर्त्यांनी थेट तीन डुक्कर आणून ती संकुलात नेण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.

पोलिसांची धावपळ आणि मध्यस्थी

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असल्याप्रमाणे, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस कर्मचारी अत्यंत सतर्क होते. आंदोलकांनी डुक्कर परिसरात सोडताच पोलिसांनी स्वतःच्या हाताने आणि गोणपाटाच्या साहाय्याने त्या डुकरांना पकडण्यासाठी रस्त्यावर मोठी धावपळ केली. कार्यकर्त्यांनी पोलिसांना रोखण्याचा आणि डुकरांना आत नेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना रोखले व डुकरांना ताब्यात घेतले.

शेवटी, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी दोन्ही बाजूंशी मध्यस्थी केली. संकुलात आणलेल्या बकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी अखेर वाहने मागवण्यात आली असून, सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस नागरिकांना शांततेचे आवाहन करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page