चंद्रपुरात घोडेबाजार जोरात, काँग्रेसचे २३ नगरसेवक ‘नॉट रिचेबल’; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक आरोप!”

विशेष प्रतिनिधी, महाराष्ट्र मिशन चंद्रपूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली परिसरातील काँग्रेसचे नगरसेवक अचानक संपर्क क्षेत्राबाहेर (नॉट रिचेबल) गेल्याने खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत आक्रमक आणि उद्विग्न प्रतिक्रिया दिली असून, राजकारणातील घसरत्या नीतीमत्तेवर तीव्र शब्दांत बोट ठेवले आहे.
पाच-पाच लाखांना लोक विकली गेली; वडेट्टीवारांचा दावा
माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी नगरसेवक बेपत्ता झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, “आमचे जवळपास २३ नगरसेवक सध्या नॉट रिचेबल आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार सुरू आहे. मला खात्री आहे की, आमच्या या नगरसेवकांना प्रत्येकी पाच-पाच लाख रुपये देऊन अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे. पैशाच्या जोरावर आमचे लोक विकले गेले आहेत.”
घरांवर ‘व्हीप’ चिटकवणार, अपात्रतेची कारवाई सुरू
आपल्याच पक्षाचे लोक फुटल्यामुळे मोठा राजकीय धक्का बसलेल्या वडेट्टीवार यांनी आता बंडखोरांविरोधात कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. “आम्ही आता पक्षाचा अधिकृत ‘व्हीप’ (Whip) जारी करणार आहोत. हे नगरसेवक जागेवर नसल्यामुळे हा व्हीप थेट त्यांच्या घरांवर चिटकवला जाईल. जर त्यांनी पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केले, तर त्यांना अपात्र करण्याची कायदेशीर प्रक्रिया आम्ही तात्काळ सुरू करणार आहोत,” असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.
एका मतासाठी १० लाखांपर्यंत व्यवहार?
सुरुवातीला काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक बेपत्ता असल्याचा दावा फेटाळण्यात येत होता, मात्र आता खुद्द वडेट्टीवार यांनीच याला दुजोरा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विदर्भातील तिन्ही जिल्ह्यांतून मिळून जवळपास ७० नगरसेवक नॉटरिचेबल असल्याची चर्चा असून, एका मतासाठी तब्बल १० लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार झाल्याची खाजगीत बोलले जात आहे.
आमदार जेव्हा ‘ठेकेदार’ बनतात, तेव्हा पैशाची मस्ती आणि अशी परिस्थिती निर्माण होते, अशी चपराकही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावली. विधान परिषदेच्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या गोटात झालेल्या या मोठ्या पडझडीमुळे काँग्रेस पक्षासमोर आता आपले उरलेले सर्वपक्षीय बळ एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.



