जुन्या हद्दीच्या पोलिसांचा ‘नाकावर हात’, खराडी पोलिसांची तत्परता; पण राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मेहेरबानीमुळे खांदवे नगर मधील अवैध दारूचा धंदा पुन्हा तेजीत!

महाराष्ट्र मिशन / विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील खांदवे नगर, सर्व्हे क्र. १२१, लेन क्र. ३ मध्ये कवडे वस्ती येथे ग्लोबल पब्लिक स्कूल शेजारी सुरू असलेल्या
अवैध दारू धंद्यांचे प्रकरण आता अत्यंत गंभीर वळणावर पोहोचले आहे. या प्रकरणाची थेट मुख्यमंत्री कार्यालय (CMO) आणि पोलीस महासंचालक कार्यालयातून (DGP Office) दखल घेतली गेली होती. एवढ्या वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर विमानतळ पोलिसांनी या ठिकाणी वरवरची पाहणी केली. मात्र, “आम्हाला त्या ठिकाणी असे काहीही मिळून आले नाही,” असा अजब फतवा काढत आणि दावा करत विमानतळ पोलिसांनी या अवैध धंद्याला एक प्रकारे क्लिन चिट देण्याचा प्रयत्न केला होता.
खराडी पोलिसांची धडक कारवाई आणि पोलखोल
दरम्यान, प्रशासकीय पुनर्रचनेत काही महिन्यांपूर्वी हा परिसर विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून वगळून खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आला. हद्द बदलताच खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी कोणतीही टाळाटाळ न करता तात्काळ माहिती काढून या अवैध अड्ड्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत त्यांना संबंधित ठिकाणी थेट दारू विक्री होताना रंगेहात आढळून आले. खराडी पोलिसांच्या या कारवाईमुळे विमानतळ पोलिसांचा ‘अवैध धंदा अस्तित्वातच नसल्याचा’ खोटा दावा चव्हाट्यावर आला.
काही काळ लागला चाप, पण…
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या या धडक कारवाईमुळे काही काळ या अवैध दारू विक्रीला चांगलाच चाप लागला होता आणि परिसरातील हा त्रासदायक प्रकार पूर्णपणे बंद झाला होता. यामुळे स्थानिक नागरिक आणि विशेषतः महिला वर्गाने सुटकेचा श्वास सोडला होता.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने पुन्हा ‘जैसे थे’
परंतु, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. खराडी पोलिसांनी कारवाई करून काही दिवस उलटत नाहीत तोच, हा अवैध दारूचा धंदा पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला आहे. स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department) अभय आणि आशीर्वादानेच हा काळा धंदा राजरोसपणे पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक कार्यालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणारे विमानतळ पोलीस आणि आता या धंद्याला मूक संमती देणारा राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आता यावर वरिष्ठ पातळीवरून कायमस्वरूपी आणि कडक कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



