पुणे शहर

फुगेवाडीत एकाच दिवशी ८ जणांच्या मृत्यू 

विषारी गावठी दारूमुळे हडपसर मध्येही बळी

पुणे : पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील फुगेवाडी भागात एकाच दिवशी ८ जणांच्या मृत्यूने खळबळ माजली. त्यापैकी ६ जणांचा मृत्यू हा विषारी गावठी दारूमुळे झाल्याचे समजते.

गेल्या दोन दिवसात पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरात एकूण १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील ११ जणांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाला आहे, तर चार जणांचा मृत्यू इतर कारणाने झाला आहे.

दारू पिऊन घरी आल्यावर काही वेळाने तोंडातून फेस आला, कुणाला चक्कर आल्याने बाथरूममध्ये पडले तर कुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. या दारूकांड प्रकरणी आतापर्यंत एकाला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

पुणे पोलीस उपायुक्तांनी या मृत्यूकांडाच्या माहितीला दुजोरा दिला. दारू पिऊन मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ११ आहे. यात पिंपरीतील ६ आणि हडपसरच्या ५ जणांचा समावेश आहे. बाकी इतर मृत्यू हे वेगवेगळ्या कारणाने झाले आहेत. यात नैसर्गिकरित्या मृत्यू झालेल्यांचाही समावेश आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

तसेच या मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने विषारी दारू मृत्यू प्रकरणी योगेश वानखेडे याला अटक केली. तो स्वतः पोलिसांसमोर हजर झाला , अखेर त्याला अटक करून चौकशी सुरू करण्यात आली.

अटकेतील आरोपी योगेश वानखेडे यानेच पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी आणि पुण्याच्या हडपसर भागात केमिकलयुक्त स्पिरिट पोहोचवले होते. या स्पिरिटपासून बनवलेली घातक हातभट्टीची दारू प्यायल्याने पिंपरीत ६ जणांना जीव गमवावा लागला आहे

तर याच विषारी दारूमुळे हडपसर मधील ५ जण दगावले. त्यांच्यापैकी अनेक लोकांना गावठी दारू प्यायल्यावर उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होत होता

राहुल शरद क्षीरसागर (४५)विजय भूकुरलाल शर्मा (४५) अरुण डाडर ( सर्व राहणार हडपसर)अशोक रमेश चव्हाण ( रा. काळेपडळ)पाडुरंग फुगे, विजय प्रकाश राठोड, राजेंद्र प्रकाश राठोड, राजू रजपुत, अकबर पठाण, बाबा शेख, आनंद देसाई, आनंद निकाळजे ( फुगेवाडी) अशी मृतांची नावे आहेत.

सुभाष डिगीकर यांच्यावर मेडी पॉईंट हॉस्पिटल आणि अक्षय अवसरमल यांच्यावर यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page