पुणे शहर

पुणे पोलिसांचा ‘सुपरफास्ट’ थरार! ६५ हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी; दौंड रेल्वे स्थानकातून बालिकेची सुखरूप सुटका.

पुणे (प्रतिनिधी) : पुणे स्टेशन परिसरातील दत्तमंदिरासमोरील मोकळ्या जागेत झोपलेल्या भोसले कुटुंबीयाच्या अवघ्या एका वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेला अवघ्या १६ तासांत यश आले आहे. पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि कौशल्याने तपास करत तीन आरोपींना दौंड रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले असून, बालिकेची सुखरूप सुटका केली आहे. ही धडाकेबाज कारवाई बंडगार्डन पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेने संयुक्तपणे केली.

गाढ झोपेत असताना कृत्य, सीसीटीव्हीत कैद

दिनांक ३० मे २०२६ रोजी रात्री ९:१५ वाजण्याच्या सुमारास बालिकेची आई गाढ झोपेत असताना अज्ञात महिला व पुरुषाने मुलीचे अपहरण केले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा आणि बंडगार्डन पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली. रेल्वे स्टेशन आणि परिसरातील तब्बल ६५ हून अधिक सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांची अत्यंत बारकाईने तपासणी केली असता, संशयित महिला व पुरुष चिमुरडीला घेऊन प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून सुटणाऱ्या ‘पनवेल-नांदेड-पनवेल’ एक्सप्रेसमध्ये चढताना आढळून आले.

असा रचला तपासाचा सापळा

आरोपी रेल्वेने नांदेडच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट होताच, पुणे पोलिसांनी रेल्वे मार्गिकेवरील सर्व महत्त्वाच्या स्थानकांवरील आरपीएफ (RPF), जीआरपी (GRP), स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांना सतर्क केले. पोलिसांची वेगवेगळी पथके तातडीने दौंड, कुर्डुवाडी, बार्शी, सोलापूर, आणि लातूरच्या दिशेने रवाना करण्यात आली. या चौफेर नाकेबंदीमुळे, संशयित आरोपी दौंड रेल्वे स्थानक परिसरातच पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

सदरची कौतुकास्पद कामगिरी पुणे शहराचे माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वीनी सातपुते, पोलीस उप आयुक्त (गुन्हे)  गौहर हसन, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-५) श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या मोहिमेत खंडणी विरोधी पथक-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, युनिट-५ चे पोलीस निरीक्षक संदिपान पवार, बंडगार्डन पो.स्टे. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, आरपीएफचे पोलीस निरीक्षक भगवान ईप्पर, एलसीबी उस्मानाबादचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौघुले, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम (युनिट-४), आरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण गाढवे, तसेच बंडगार्डन पोलीस स्टेशन, खंडणी विरोधी पथक-२, युनिट-५ आणि युनिट-६ च्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

अपहरण झालेल्या बालिकेला सुखरूप ताब्यात घेऊन पोलीस पथक पुण्याच्या दिशेने रवाना झाले असून, पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत. पोलिसांच्या या जलद आणि यशस्वी कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page