पुणे हादरले! कारेगाव सेक्स रॅकेटमध्ये ‘बांगलादेशी’ कनेक्शन; ATS च्या छाप्यात ७ महिलांची सुटका, मुख्य सूत्रधार फरार!’

कारेगाव (विशेष प्रतिनिधी) : पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या एका लॉजिंगमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर दहशतवादी विरोधी शाखा (ATS) आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. मंगळवारी (ता. २) दुपारी चारच्या सुमारास टाकण्यात आलेल्या या छाप्यामुळे कारेगाव परिसर आणि जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल ७ पीडित महिलांची या नरकयातनेतून सुटका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपअधिक्षक भूषण माने यांना या लॉजिंगमध्ये महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने देहविक्री करून घेतली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ATS आणि रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने मंगळवारी दुपारी अचानक छापा टाकला.
३ महिला बांगलादेशी; महिला सुधारगृहात रवानगी
पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात एकूण ७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यांची सखोल चौकशी केली असता त्यापैकी ३ महिला या बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व पीडित महिलांना सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने महिला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तसेच, यातील बांगलादेशी महिलांना आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या मायदेशी म्हणजेच बांगलादेशात पाठवण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे.
एक आरोपी अटकेत, मुख्य सूत्रधार फरार
याप्रकरणी पोलिसांनी १) लुतफ्फर मुज्जमलहक शेख (वय ४५ वर्षे, मूळ रा. नालीताजल, ता. बाजीतपुर, थाना-धनियाखाली, जि. हुगली, पश्चिम बंगाल; सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) आणि २) बबलू साहू (सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे; मूळ रा. ओडिशा) यांच्याविरुद्ध स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये (PITA) गुन्हा दाखल केला आहे.
ताब्यात घेण्यात आलेला मुख्य आरोपी लुतफ्फर शेख याला पोलिसांनी गुन्ह्याखाली अटक केली असून, त्याचा साथीदार बबलू साहू हा पोलिसांचा छापा पडताच घटनास्थळावरून फरार झाला आहे. फरार आरोपी बबलू साहू हा सराईत असून, यापूर्वी देखील त्याच्यावर अशाच प्रकारे वेश्याव्यवसाय चालविल्याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सदरची धडक कारवाई पोलीस उपअधिक्षक भूषण माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली असून, फरार आरोपी बबलू साहूचा शोध रांजणगाव पोलीस घेत आहेत. या कारवाईमुळे महामार्गावरील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.



