पुणे शहर

“पुणे पोलिसांच्या डोळ्यादेखत ‘डेंजर’ डंपर; नंबरप्लेटशी छेडछाड करून नियमांना हरताळ!”

पुणे : पुणे-नगर रोड आता ‘अपघातप्रवण’ नव्हे, तर ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. चंदन नगर बायपास, खराडी नाका, वाघोली, केसनंद ते लोणीकंद या पट्ट्यात अवजड वाहनांचा, विशेषतः डंपरचा मुक्त संचार सुरू असून वाहतूक नियमांचे सर्व संकेत पायदळी तुडवले जात आहेत. आज सकाळी ११:०७ वाजता खराडी नाका येथे ‘महाराष्ट्र मिशन’च्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या एका डंपरच्या दृश्यानी या परिस्थितीचे भयावह वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणले आहे.

नियमांची एैसी-तैसी, पोलिसांची बघ्याची भूमिका

सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास सक्त मनाई असतानाही, हे डंपर राजरोसपणे सुसाट धावत आहेत. भररस्त्यात डंपरची बॉडी ओव्हरलोड करून दगड वाहतूक केली जात आहे, जे कोणत्याही क्षणी जीवघेणा ठरू शकते. विशेष म्हणजे, वाहतूक पोलीस या मार्गावर उपस्थित असूनही या मुजोर चालकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. या निष्क्रियतेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

रक्त सांडले, तरी प्रशासन सुस्त

या परिसरातील रस्त्यांवर गेल्या काही काळापासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. निष्पाप नागरिकांचा या अवजड वाहनांखाली चिरडून मृत्यू झाल्याच्या अनेक दुर्दैवी घटना ताज्या आहेत. एकदा डंपरच्या चाकाखाली सापडलेला नागरिक वाचण्याची शक्यता नगण्य असते. असे असतानाही, प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजनांचा अभाव आहे.

नंबरप्लेटमध्ये फेरफार – गुन्हेगारीला वाव

‘महाराष्ट्र मिशन’च्या टीमला आढळलेल्या डंपरवर (MH 12… 8217) नंबरप्लेट खोडून केलेली छेडछाड हे स्पष्ट करते की, हे चालक कायद्याला घाबरत नाहीत. नंबरप्लेट बदलण्यामागे अपघाताची जबाबदारी टाळण्याचा किंवा गुन्हेगारी हेतू तर नाही ना? असा संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

जनतेचा कडक इशारा

“आम्हाला सुरक्षित रस्त्यांचा अधिकार आहे,” असा पवित्रा घेत आता नागरिक आक्रमक झाले आहेत. प्रशासनाने या मुजोर डंपर चालकांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या यंत्रणेवर त्वरित कठोर कारवाई करावी, अन्यथा या भागात तीव्र जनआंदोलने उभी राहतील, असा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page