साहित्य संमेलनाचे शतक! ९९ उपक्रमांनंतर पुण्यातील विद्यापीठ प्रांगणात होणार ऐतिहासिक १०० वे संमेलन.

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे १०० वे साहित्य संमेलन ऐतिहासिक स्वरूपात पार पडणार आहे. हे संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पत्रकार परिषदेत केली. साहित्य संमेलनाच्या इतिहासात पुण्यात होणारे हे १४ वे संमेलन असणार आहे.
या वेळी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर आणि ‘समर्थ युवा फाऊंडेशन’चे अध्यक्ष राजेश पांडे उपस्थित होते.
विद्यापीठ परिसर बनणार साहित्य नगरी
संमेलनातील मुख्य कार्यक्रम विद्यापीठाची मुख्य इमारत, क्रीडा संकुल आणि छत्रपती संभाजी महाराज सभागृह येथे होणार आहेत. याशिवाय, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा परिसरात कवीकट्टा व कथाकथनासारखे उपक्रम राबवले जाणार आहेत. शहरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी आणि उपस्थितांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी विद्यापीठाची निवड करण्यात आल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले.
९९ उपक्रमांची ‘नांदी’
१०० व्या साहित्य संमेलनानिमित्त १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत महाराष्ट्रातील विविध ४८ ठिकाणांसह एकूण ९९ साहित्यिक उपक्रम राबवले जाणार आहेत. यातून १०० व्या संमेलनाची जय्यत तयारी केली जाणार असून, साहित्य प्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.



