देवणीच्या शेतकऱ्याला अखेर मिळाला मदतीचा हात; प्रशासनाकडून पसंतीचा बैल उपलब्ध

लातूर : देवणी तालुक्यातील बोंबली (बु.) येथील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. वीज पडून बैल दगावल्याने आणि परिस्थितीमुळे नांगरणीसाठी स्वतःच्या पत्नीला जू खांद्यावर घेण्याची वेळ आलेल्या गायकवाड कुटुंबाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर पशुसंवर्धन विभागाने अखेर त्यांच्या पसंतीचा आणि शेतीकामासाठी सक्षम बैल उपलब्ध करून दिला आहे.
यापूर्वी प्रशासनाने बैल दिला होता, मात्र तो शेतीकामासाठी अनुकूल नसल्याने पुन्हा अडचण निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने अधिकार्यांना शेतकऱ्याला त्याच्या पसंतीचा, सक्षम बैल शोधून देण्याचे निर्देश दिले. यानंतर पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोहीम हाती घेतली.
शुक्रवारी जिल्हा उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले, सहाय्यक आयुक्त डॉ. श्रीधर शिंदे, डॉ. राघवेंद्र पडगीलवार आणि डॉ. जितेंद्र वाघमारे यांनी काशिनाथ गायकवाड यांना सोबत घेऊन रेणापूर तालुक्यातील खरोळा येथे बैलांची पाहणी केली. केवळ पाहणीच नव्हे, तर निवडलेल्या बैलाला कुळवाला जुंपून दोन तास प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. बैलाची ताकद आणि सहनशक्ती पाहूनच त्याला अधिकृतपणे निवडण्यात आले.
गायकवाड कुटुंबाला मोठा दिलासा
नवीन बैलाबाबत समाधान व्यक्त करताना काशिनाथ गायकवाड म्हणाले, “अनेक बैलांची प्रत्यक्ष पाहणी आणि चाचणी केल्यानंतर मी एका मजबूत बैलाची निवड केली. आता तो शेतीकामासाठी योग्य असल्याने आमची मोठी अडचण दूर झाली आहे.”
प्रशासनाने केवळ बैल देऊन न थांबता, तो शेतीसाठी खरोखर सक्षम आहे का, याची खातरजमा करून शेतकऱ्याला दिलासा दिल्यामुळे परिसरात कौतुक होत आहे.



