मंचरमधील बनावट दूध निर्मिती रॅकेटचा तपास गतिमान; तीन आरोपींची निवासस्थाने व कार्यालयांवर छापे!

मंचर (ता. आंबेगाव) : आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे उघडकीस आलेल्या धक्कादायक बनावट दूध निर्मिती आणि भेसळ प्रकरणाचा तपास आता अधिक गतिमान झाला आहे. या गुन्ह्यातील तीन मुख्य संशयित आरोपींच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर मंगळवारी (दि. ७) पोलिसांनी संयुक्तपणे दिवसभर मोठी झाडाझडती घेतली. या कारवाईत पोलिसांनी तीन लॅपटॉप आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली असून, यामुळे या रॅकेटमधील अनेक धागेदोरे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखा, खेड विभाग आणि मंचर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यामध्ये मुख्य आरोपी सुशांत हिंगे यांचे मंचर व अवसरी येथील, संदीप लोढा यांचे मंचर येथील आणि ठकसेन आरगडे यांचे पिंपळगाव-खडकी (ता. आंबेगाव) येथील निवासस्थान व कार्यालयांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि मंचरचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, अभिजीत सावंत यांच्यासह मोठ्या पोलिस फौजफाट्याने सहभाग घेतला होता. अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉप आणि कागदपत्रांच्या आधारे पोलिस आता आरोपींचे आर्थिक व्यवहार आणि त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तींची साखळी तपासत आहेत. बनावट दूध तयार करण्यासाठी कोणती घातक रसायने वापरली जात होती आणि ही भेसळयुक्त उत्पादने नेमकी कुठे वितरित केली जात होती, याचा कसून तपास सुरू आहे.
आरोग्याशी खेळणाऱ्या या बनावट दूध रॅकेटचा पर्दाफाश केल्यामुळे परिसरातून संताप व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे पोलिस आणि अन्न सुरक्षा विभागाच्या या धडक कारवाईचे नागरिक स्वागत करत आहेत. तपासाची व्याप्ती वाढत असून, या प्रकरणात आणखी कोणकोणते मोठे मासे गळाला लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



