नागपुर

RTO ‘वसुली रॅकेट’चा विधानसभेत पर्दाफाश; मुख्यमंत्र्यांची SIT चौकशीची घोषणा!

नागपूर: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, RTO विभागातील कथित भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली, करचुकवेगिरी आणि नोंदणी प्रक्रियेतील गंभीर अनियमिततांचा मुद्दा विजय डेट्टीवार यांनी अत्यंत आक्रमकपणे उपस्थित केला. यावेळी त्यांनी सभागृहात ऑडिओ क्लिप्स सादर करत RTO विभागात एक मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा दावा केला.

मोठे रॅकेट आणि गंभीर आरोप:

नागपूर RTO मध्ये चोरीच्या वाहनांच्या नोंदणीसह अनेक गैरप्रकार सुरू असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. अनेक अधिकारी १५ वर्षांहून अधिक काळ विदर्भात कार्यरत असल्याचा मुद्दा उपस्थित करत, त्यांनी बजरंग खरमाटे (निवृत्त RTO अधिकारी), रवींद्र भुयार (प्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला), राजू नागरे (निलंबित मोटार वाहन निरीक्षक, अमरावती), आनंद मोहोड (मोटार वाहन निरीक्षक, गोंदिया) आणि योगेश खेसनार (निलंबित मोटार वाहन निरीक्षक, खामगाव) यांच्यावर गंभीर आरोप केले. हे अधिकारी मिळून बेकायदेशीर वसुली करत असून, त्यास विरोध करणाऱ्यांना ट्रान्सपोर्टरमार्फत तक्रारदार उभे करून एसीबी (ACB) ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही करण्यात आला. तसेच, महागड्या आयातीत वाहनांची नोंदणी महाराष्ट्राऐवजी इतर राज्यांत करून राज्याचा मोठा महसूल बुडवला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

 सरकारची कारवाई:

या गंभीर प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT मार्फत चौकशीची घोषणा केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयपीएस (IPS) अधिकारी प्रियांका ननावरे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. परिवहन मंत्र्यांनी यावर स्पष्ट केले की, हे पथक एका महिन्याच्या आत अहवाल सादर करेल आणि त्यानंतर दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page