लोणीकंद मारहाण प्रकरण: दोषी पोलीस कर्मचारी मुख्यालयात तडकाफडकी रवान!

पुणे : लोणीकंद पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने वकील बांधवास मारहाण केल्याची घटना घडल्याचा गंभीर आरोप काही वकिलांनी केला होता. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पुणे परिसरातील वकील वर्गात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी सविस्तर चौकशी करून तातडीने पोलीस उपायुक्तांना अहवाल सादर केला होता.
या अहवालानंतर वरिष्ठांकडून तातडीने कारवाई करण्यात आली असून, पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची पोलीस मुख्यालयात बदली (अटॅच) करण्यात आली आहे.
पुढील विभागीय चौकशी सुरू
संबंधित प्रकरणाची माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी सांगितले की, प्राप्त अहवालाच्या आधारे वरिष्ठांनी ही कारवाई केली असून, याप्रकरणी पुढील विभागीय चौकशी आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणात तातडीने पावले उचलल्यामुळे पोलीस वर्तुळात व प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.



