छ. संभाजीनगर

घाटी रुग्णालयाच्या कामावरून झालेली कानउघडणी भोवली? 

पीडब्ल्यूडी मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या तडकाफडकी राजीनाम्याची चर्चा जोरात.

छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) मराठवाडा प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी ३१ जुलै रोजी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा विभागाच्या सचिवांकडे सादर केला आहे. पदोन्नतीची फाईल शासनाकडे दीर्घकाळ रेंगाळल्याने आणि पात्र असूनही डावलले जात असल्याच्या तीव्र उद्विग्नतेतून त्यांनी आपल्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेला चार वर्षे आधीच पूर्णविराम दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर त्यांनी व्हॉट्सॲपवर ठेवलेले “अंत नहीं, यह एक नई शुरुआत है…” हे स्टेटस सध्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा सर्वात मोठा विषय ठरले आहे.

अतुल चव्हाण यांच्या पत्नी अनुराधा चव्हाण या फुलंब्री मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार आहेत. एकाच कुटुंबात राजकारण आणि प्रशासनातील महत्त्वाची पदे असल्याने यापूर्वी काहींनी शासनाकडे त्यांच्याविरोधात तक्रारी केल्याचीही चर्चा रंगली होती. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शासनाने २२ जून रोजी चव्हाण यांची नगर परिषद प्रशासन संचालनालय, वरळी (मुंबई) येथे मुख्य अभियंता म्हणून बदली केली होती आणि त्यांना ३१ जुलै रोजी तिथे रुजू होण्याचे आदेश दिले होते.

सचिवपदाच्या पदोन्नतीसाठी ते पूर्णपणे पात्र असल्याने आपल्याला संधी मिळेल, अशी त्यांना मोठी अपेक्षा होती. याबाबतची पदोन्नतीची फाईल शासनदरबारी सादरही झाली होती; परंतु ३१ जुलैच्या सायंकाळपर्यंत त्यावर कोणताच निर्णय झाला नाही. पात्र अधिकाऱ्यांना डावलून इतरांना प्राधान्य दिले जात असल्याच्या तीव्र नाराजीतून त्यांनी ३२ वर्षांची सेवा सोडण्याचा निर्णय घेतला. शासकीय नियमानुसार ते मार्च २०३० मध्ये सेवानिवृत्त होणार होते, मात्र चार वर्षे आधीच त्यांनी राजीनामा दिला आहे.

काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घाटी रुग्णालयातील रखडलेल्या आणि निकृष्ट कामांवरून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांची जाहीरपणे तीव्र शब्दांत कानउघडणी केली होती.

मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड असलेल्या घाटी रुग्णालयातील इमारती आणि वॉर्डांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून आणि डीपीडीसीमधून (DPDC) कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, निधी उपलब्ध असूनही बांधकाम विभागाच्या असहकार्यामुळे कामे अर्धवट आणि निकृष्ट दर्जाची झाल्याचे पाहणीदरम्यान समोर आले. रिफ्रेशमेंट आणि दुरुस्तीच्या कामांची पाहणी करताना पालकमंत्री संजय शिरसाट यांचा संताप अनावर झाला होता. “१४ कोटींमध्ये नवीन बिल्डिंग तयार होते, पण ३ वर्षांत तुमच्याकडून साधी दुरुस्तीची कामे झाली नाहीत?” अशा कडक शब्दांत पालकमंत्र्यांनी अतुल चव्हाण यांना सर्वांसमोर धारेवर धरले होते आणि काम त्वरित पूर्ण न झाल्यास थेट कारवाईचा इशारा दिला होता.

मंत्र्यांच्या या तीव्र संतापानंतर आणि कारवाईच्या इशाऱ्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अतुल चव्हाण यांनी ३१ जुलै रोजी आपला राजीनामा सचिवांकडे सुपूर्द केला.

अतुल चव्हाण हे भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती असल्याने आणि मंत्र्यांच्या कानउघडणीनंतर त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सत्ताधारी महायुती आणि प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी ठेवलेल्या व्हॉट्सॲप स्टेटसमुळे ते आगामी काळात पूर्णवेळ राजकीय मैदानात उतरणार की नवीन काही पाऊल उचलणार, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page