पुणे शहर

पुणे विषारी दारूकांड: २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या टोळीवर अखेर ‘मोक्का’! सीआयडीची धडक कारवाई

उरुळी कांचनचा कुख्यात गुंड दत्ता लोंढ्यासह ९ जणांच्या टोळीचे उच्चाटन करण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचा कठोर निर्णय; विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी दिली मंजुरी

विशेष प्रतिनिधी, महाराष्ट्र मिशन (पुणे) : पुणे शहर व परिसरात मिथेनॉल मिश्रित अत्यंत विषारी गावठी हातभट्टी दारूची बेकायदेशीर विक्री करून तब्बल २१ निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या भयंकर दारूकांड प्रकरणातील कुख्यात संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. टोळीप्रमुख दत्ता ऊर्फ भाऊ भिवराव लोंढे याच्यासह त्याच्या ८ साथीदारांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९’ (MCOCA – मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा नोंद क्रमांक ३७९/२०२६ अंतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या विषारी हातभट्टी दारूच्या सेवनामुळे हडपसर परिसरातील ०४ आणि दापोडी व फुगेवाडी परिसरातील १७ अशा एकूण २१ व्यक्तींचा तडफडून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा आणि राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली होती.

सीआयडीच्या तपासादरम्यान निष्पन्न झाले की, मुख्य आरोपी दत्ता लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली) याने स्वतःच्या नेतृत्वाखाली संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती. स्वतःच्या आणि टोळीच्या बेकायदेशीर आर्थिक फायद्यासाठी या टोळीने मिथेनॉलसारख्या जीवघेण्या रसायनाचा वापर करून विषारी गावठी हातभट्टी दारूची निर्मिती, वाहतूक आणि विक्रीचे जाळे पसरवले होते.

सदर टोळीकडून पुणे जिल्हा व परिसरात सातत्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले जात होते. यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड भीती, असुरक्षितता व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वीही टोळीप्रमुख व सदस्यांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे या टोळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोक्काची कारवाई अनिवार्य बनली होती.

या गुन्ह्यातील आरोपींविरुद्धचे सर्व पुरावे व गुन्हे अभिलेखाची सखोल पडताळणी करून, सीआयडी पुणे पथकाचे पोलीस उपअधीक्षक श्री. शामराव काळे यांनी पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक (गुन्हे पश्चिम, सीआयडी) श्री. सुधीर हिरेमठ यांच्याकडे मोक्का कलमे समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रकरणाची सूक्ष्म छाननी करून मा. श्री. सुधीर हिरेमठ यांनी मोक्का कायदे कलम ३(१)(i)(ii), ३(२) व ३(४) चा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.

मोक्काअंतर्गत कारवाई झालेले आरोपी:

टोळीप्रमुख: दत्ता ऊर्फ भाऊ भिवराव लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे)

टोळीतील ८ साथीदार:

१) आकाश दिपक जाधव (रा. हडपसर, पुणे)

२) योगेश राजेंद्र व्हनकडे (रा. मुंढवा, पुणे)

३) राधेशाम हरीराम प्रजापती (रा. उरुळी कांचन, पुणे)

४) कल्पेश अशोक अग्रवाल (रा. खडकी, पुणे)

५) आर्यन संजीव धोत्रे (रा. वडारवाडी, पुणे)

६) अभिषेक अरुण चौबे (रा. नवी मुंबई)

७) अरुण जगदंबा चौबे (रा. नवी मुंबई)

८) अंकित अरुण चौबे (रा. नवी मुंबई)

दाखल गुन्ह्याची कलमे:

भारतीय न्याय संहिता (BNS 2023): कलम १०५, १२३, १२५, २७५, ३(५), ३(६), ३(७), ३(९), ११८, २३८, ३३६, ३३७, ३३९, ३४०, मुंबई दारूबंदी कायदा १९४९: कलम ६५(ई), ६८, ८१ व ८३ मोक्का (MCOCA 1999): कलम ३(१)(i)(ii), ३(२) व ३(४) ही मोक्काची कारवाई अपर पोलीस महासंचालक श्री. सुनील रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुधीर हिरेमठ व पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी श्री. शामराव काळे (पोलीस उपअधीक्षक, सीआयडी पुणे) यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page