पुणे शहर

एमपीएससी आंदोलनात ओमराजेंविरोधात ‘गद्दार’च्या घोषणा; पक्षांतरावर विद्यार्थ्यांचा संताप

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेले शिवसेना (शिंदे) गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. निंबाळकर आंदोलनस्थळी पोहोचताच काही विद्यार्थ्यांनी ‘ओमराजे परत जा’, तर काहींनी ‘गद्दार-गद्दार’ अशा घोषणा दिल्या.

निंबाळकर यांच्या अलीकडील पक्षांतरावरून विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. घोषणाबाजी सुरू असतानाच निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. “मी कुठे पळून गेलेलो नाही, इथेच तुमच्यात उभा आहे,” असे सांगत त्यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेसोबत काम करत असल्याचे स्पष्ट केले.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलताना निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांची परीक्षा ही त्यांच्या आयुष्याशी संबंधित असल्याचे सांगितले. पेपरफुटीमुळे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसतो, अशी भूमिका त्यांनी मांडली. एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

घोषणाबाजी सुरूच राहिल्याने निंबाळकर काहीसे संतप्त झाले. “तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो, मग माझं चुकलं का?” असा सवाल त्यांनी विद्यार्थ्यांना केला. त्यानंतरही काही काळ घोषणाबाजी सुरू राहिली. अखेर आंदोलकांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले.

दरम्यान, एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपळकर यांची बदली झाल्यानंतरही अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी कायम आहे. त्यामुळे पुण्यातील आंदोलनाला राजकीय पाठिंबा वाढत असतानाच, आंदोलनस्थळी येणाऱ्या नेत्यांनाही विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page