कुंभमेळा बनावट निविदा घोटाळा: काँग्रेसचा हल्लाबोल, मंत्र्यांच्या नातेवाईकासह ३ जण अटकेत!
५९१ कोटींच्या वर्क ऑर्डर प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले

नाशिक / मुंबई विशेष वृत्त : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी ५९१ कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर्स तयार करून ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट निविदांच्या माध्यमातून ठगांनी ठेकेदारांकडून ३ कोटींहून अधिक रक्कम उकळली आहे. या गंभीर प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांचा दूरचा नातेवाईक (पुतण्या) तनय महाजन याचा सहभाग असल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.
घोटाळ्याचे स्वरूप आणि बनावट कागदपत्रे
नाशिकमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तब्बल ५९१ कोटी रुपयांच्या ५ बनावट निविदा तयार करण्यात आल्या होत्या. यामध्ये हाउसकीपिंग, पोलिसांना आहार पुरवणे आणि स्नानासाठी साहित्य उपलब्ध करून देणे यांसारख्या कामांचा समावेश होता. विशेष म्हणजे, ठेकेदारांचा विश्वास बसावा म्हणून आरोपींनी ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे’ खोटे दस्तऐवज, विभागीय आयुक्तांची बनावट डिजिटल सही आणि भारत सरकारची राजमुद्रा वापरून बोगस वर्क ऑर्डर्स तयार केल्या होत्या.
या ठगांनी एका ठेकेदाराला हाउसकीपिंगचे काम मंजूर करण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून तब्बल २ कोटी १७ लाख ५० हजार रुपये उकळले, तर छत्रपती संभाजीनगर येथील एका ठेकेदाराकडून २५ लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जामनेरमधून तिघे जण अटकेत
या प्रकरणी पोलिसांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर (जळगाव) मतदारसंघातून तिघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तनय अनंत महाजन, नरेंद्र तोताराम महाजन आणि शकील अहमद सलीमउद्दीन शेख यांचा समावेश आहे. यातील मुख्य आरोपी तनय महाजन हा मंत्री गिरीश महाजन यांचा दूरचा पुतण्या असल्याचे उघड झाले आहे.
विरोधकांचा कडाडून विरोध व टीका
या महाघोटाळ्यानंतर काँग्रेसने राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी, “कुंभमेळा श्रद्धेचा मेळा की भ्रष्टाचाराचा मेळावा?” असा सवाल करत, शेकडो कोटींच्या वर्क ऑर्डर्स निघत असताना प्रशासन काय करत होते, असा जाब विचारला आहे. तसेच, राम मंदिराच्या दानपेटीतील चोरीनंतर आता कुंभमेळ्याच्या नावाने भ्रष्टाचार सुरू असेल, तर महाराष्ट्र हे कधीही खपवून घेणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
याचधर्तीवर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून सरकारवर निशाणा साधला. “सरकारी तिजोरी लुटण्याचा हा कोणता विकास? कागदावर कामे आणि यंत्रणेला अंधारात ठेवून काढलेल्या वर्क ऑर्डर्स हा केवळ भ्रष्टाचार नसून भाविकांच्या श्रद्धेवर टाकलेला दरोडा आहे,” असे म्हणत त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.
मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
या प्रकरणातील मुख्य आरोपी आपला नातेवाईक असल्याचे समोर आल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणातून तात्काळ हात झटकले आहेत. “या घोटाळ्यात माझा नातेवाईक असला तरी मी कोणालाही पाठीशी घालणार नाही. हा प्रकार समजताच मी स्वतः मुख्यमंत्र्यांना आणि पोलिस आयुक्तांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. या आरोपींच्या कुटुंबाशी माझे कोणतेही कौटुंबिक संबंध नाहीत. आता सर्व प्रक्रिया ऑनलाइन असताना, कोणतीही पडताळणी न करता मोठे ठेकेदार अशा भूलथापांना कसे बळी पडले, ही त्यांचीही मोठी चूक आहे,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.



