मुंबई

तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘नीट’ परीक्षा रद्द करा; मनसे नेते अमित ठाकरेंची राज्य सरकारवर कडक टीका!

महाराष्ट्रात समाजकारण उरले नाही, फक्त सत्ताकारणाचा खेळ सुरूय"; अहंकार बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन

मुंबई : तामिळनाडू विधानसभेत वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट’ (NEET) परीक्षा रद्द करण्याचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला आहे. या ऐतिहासिक निर्णयानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी तामिळनाडू सरकारच्या या निर्णयाचे खुलेआम कौतुक करत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. नीट परीक्षेतील वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, “महाराष्ट्रात आता समाजकारण उरलेच नसून केवळ सत्ताकारणाचा आणि दडपशाहीचा खेळ सुरू आहे,” असा तीव्र शब्दांत घणाघात त्यांनी केला आहे. तसेच, आपला राजकीय अहंकार बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले आहे.

तामिळनाडूतील ऐतिहासिक एकात्मतेचे उदाहरण

काही दिवसांपूर्वी तामिळनाडू सरकारने विधिमंडळात ‘नीट’ परीक्षा पूर्णपणे रद्द करून केवळ बारावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मांडला होता. याविषयी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, हा ठराव मांडल्यावर तिथल्या विरोधी पक्षांनी किंवा डाव्या पक्षांनी कसलाहीतुच्छ राजकीय विरोध न करता, आपले सर्व झेंडे आणि मतभेद बाजूला सारत या निर्णयाला एकंदरीत पाठिंबा दिला. कारण तिथल्या नेत्यांना स्पष्ट ठाऊक होते की हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, जो कोणत्याही पक्षाच्या राजकारणापेक्षा कितीतरी पटीने महत्त्वाचा आहे. भाजपच्या एका आमदाराने विरोध केला असला, तरी उर्वरित सदस्यांनी जनतेच्या प्रश्नांवर राजकारण बाजूला कसे ठेवायचे याचे उत्तम उदाहरण दिले, असे त्यांनी नमूद केले.

मनसेची २०१६ मधील भूमिकेची आठवण

तामिळनाडू सरकारने घेतलेला हा धाडसी निर्णय महाराष्ट्राने वर्षभरापूर्वीच घ्यायला हवा होता, असे सांगत अमित ठाकरे म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०१६ मध्येच स्पष्टपणे सांगितले होते की, ‘नीट’ परीक्षा ही मुळात निरुपयोगी असून ती महाराष्ट्रातील ग्रामीण व मराठी विद्यार्थ्यांचे करिअर संपवण्यासाठी आणली गेली आहे. परंतु, तेव्हाच्या आणि आताच्याही सत्ताधाऱ्यांना कोणाचेही ऐकून घ्यायचे नाही, असा आरोप त्यांनी केला.

सत्ताधाऱ्यांच्या अहंकारावर आणि घोटाळ्यांवर कडाडून टीका

आज महाराष्ट्राच्या राजकारणाची जी दुर्दैवी अवस्था झाली आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे सत्ताधाऱ्यांना सत्तेची आणि बहुमताची चढलेली नशा असल्याचे अमित ठाकरे म्हणाले. NEET परीक्षा असो, MPSC किंवा विविध परीक्षांमधील पेपरफुटी असो, तलाठी भरतीमधील घोटाळे असोत किंवा शाळा-कॉलेजमधील मूलभूत सुविधांची दुरावस्था असो; विरोधकांनी आवाज उठवल्यास त्याला केवळ ‘राजकीय विरोध’ म्हणून खिजगणतीत न धरता धुडकावून लावले जाते. सत्ताधाऱ्यांच्या याच राजकीय अहंकारामुळे आज राज्यातील लाखो तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र आधी, राजकारण नंतर

राजकारण हे नेहमी लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि सामान्यांच्या भल्यासाठी असले पाहिजे, याचे भान काही राजकारण्यांना राहिले नसल्याचे ते म्हणाले. मनसे कधीही केवळ विरोधासाठी विरोध करणारी पार्टी नाही, असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, उद्या जर सरकारने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या किंवा मराठी माणसाच्या हिताचा कोणताही चांगला निर्णय घेतला, तर मनसे सर्वात आधी या सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. परंतु, त्यासाठी सरकारने आधी स्वतःचा अहंकार सोडायला हवा. “आता तरी सत्ताधाऱ्यांनी तामिळनाडूकडून धडा घ्यावा आणि ‘महाराष्ट्र आधी, राजकारण नंतर’ या भूमिकेसाठी एकत्र यावे,” अशी मागणी त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page