महाराष्ट्र

मोदींचा फोटो काढणे महागात; अमित ठाकरेंसह २५ जणांवर गुन्हा दाखल!

पुणे : पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक) महाविद्यालयात पाहणी करण्यासाठी गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कार्यालयात विनापरवानगी प्रवेश करणे, प्राचार्यांना धमकी देणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो बळजबरीने काढायला लावल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह सुमारे २५ जणांवर चतुशृंगी पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र काशिराम पाटील यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अमित ठाकरे आणि २० ते २५ पदाधिकारी व कार्यकर्ते कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय प्रशासकीय कार्यालयात आले. त्यांनी वसतिगृहातील अस्वच्छता, मेसमधील खराब जेवण आणि इतर सुविधांबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली. यादरम्यान, कार्यालयाच्या भिंतीवर लावलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो पाहिल्यानंतर अमित ठाकरेंनी तो फोटो काढण्यास सांगितले. प्राचार्यांनी यास विरोध केला असता, त्यांच्याशी उद्धट वर्तन करण्यात आले आणि कार्यकर्त्यांनी तो फोटो खाली उतरवला. तसेच कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करत आठ दिवसांत मागण्या पूर्ण न केल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देत धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

“गुन्हा दाखल झाल्याचा अभिमान”- अमित ठाकरे

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांनी अत्यंत ठाम भूमिका घेतली आहे. “माझा पहिला गुन्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी दाखल झाला होता आणि आता दुसरा गुन्हा दाखल झाला आहे तोसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी दाखल झाला आहे, त्यामुळे मला याचा सार्थ अभिमान आहे,” असे सांगत त्यांनी या कारवाईची कोणतीही भीती वाटत नसल्याचे स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पुणे शहरासह राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजप आणि मनसे आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page