मुंबई

महागाईचा भडका! कांदा ६२ रुपयांवर, तर मुंबईत दूध प्रतिलिटर १०२ रुपयांवर!

नवी दिल्ली/मुंबई : महागाईच्या वाढत्या आगीमुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. साखर, दूध, पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी सिलिंडरपाठोपाठ आता कांद्याच्या वाढलेल्या किमतींनीही ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. स्वयंपाकातील प्रत्येक आवश्यक वस्तूचे भाव वाढल्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात घरखर्च अद्याप वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

३१ ऑगस्ट रोजी राजधानी दिल्लीमध्ये कांद्याचा किरकोळ दर तब्बल ६२ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत कांदा अवघ्या ३३ रुपये प्रति किलो दराने विकला जात होता; म्हणजेच एका वर्षात कांद्याच्या किमतीत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात देशात कांद्याचा सरासरी दर ३५ रुपयांच्या आसपास होता.

मुंबईकरांच्या खिशावर आता दूध दरवाढीचा अतिरिक्त भार पडणार आहे. होलसेल बाजारात सध्या ९३ रुपये प्रति लिटर असणारे दूध १ सप्टेंबरपासून १०२ रुपये प्रति लिटर होणार आहे. म्हणजेच थेट प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ झाली आहे. हिरवा चारा, चुणी आणि पशुखाद्याचे दर वाढल्यामुळे दूध उत्पादक संघटनेने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

परदेशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधनावर झाला असून, मे महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात चार वेळा वाढ झाल्याने ते ७.५ रुपयांनी महागले आहेत. तसेच, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ७९ रुपयांची वाढ झाली असून दिल्लीत तो आता ९४२ रुपयांवर पोहोचला आहे. व्यावसायिक सिलिंडरचे भावही वाढल्याने घरगुती ग्राहकांसोबतच हॉटेल आणि छोटे व्यावसायिकही आर्थिक संकटात सापडले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page