पुणे शहर

पुण्यात एम.डी. ड्रग्स विकणाऱ्या ५ जणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून जेरबंद!

पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने शहरात कारवाईचा बडगा उगारत मेफेड्रॉन (एम.डी.) या अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी फिरणाऱ्या पाच जणांना वेगवेगळ्या कारवायांमध्ये अटक केली आहे. शिवाजीनगर आणि समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या या कारवाईत पोलिसांनी लाखांचे एम.डी. ड्रग्ससह वाहने आणि मोबाईल हस्तगत केले आहेत.

अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील अधिकारी व अंमलदार हद्दीत गस्त घाालत असताना, शिवाजीनगर येथील संचेती चौक परिसरात एक इसम एम.डी. ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी टाटा टेलिबिझनेस सर्व्हिसेस इमारतीसमोर आंबेडकर रोडवर सापळा रचून आसिफ अब्दुल शेख (वय २६, रा. काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) याला सुझुकी स्कुटरसह पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याच्याकडून २७ हजार ६६० रुपये किमतीचे ९.२२ मिलीग्रॅम मेफेड्रॉन, सुझुकी बर्गमॅन स्कुटर आणि मोबाईल फोन असा एकूण १ लाख ५२ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टदवारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या एका कारवाईत, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ए.डी. कॅम्प चौक, खाकसार मस्जिदजवळ काही इसम एम.डी. ड्रग्स विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार नाना पेठ येथील मि. बीलोबो यांच्या वाड्याच्या भिंतीजवळ सापळा रचून पोलिसांनी नासिर रसूल शेख (वय २२, रा. हडपसर), जावेद हसन शेख (वय २४, रा. कोंढवा), फराज नजिर शेख (वय २४, रा. हडपसर) आणि एक विधीसंघर्षित बालक अशा चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७१.८० मिलीग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन, गुन्ह्यासाठी वापरलेल्या ३ गाड्या आणि मोबाईल फोन असा एकूण ४ लाख ४० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) हसन गौहर आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-१ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page