महाराष्ट्र

भीषण वास्तव! राज्यात दररोज ९ पादचारी व २१ दुचाकीस्वारांचा रस्ते अपघातात मृत्यू!

ठाणे : राज्यात २०२३ मध्ये रस्ते अपघातांमध्ये ३,११० पादचारी व सुमारे ७,७८२ दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राज्यात दररोज सरासरी ८ ते ९ पादचारी आणि २१ दुचाकीस्वार रस्ते अपघातात मृत्युमुखी पडत असून, एकूण अपघाती मृत्यूंपैकी सुमारे ७० टक्के मृत्यू हे पादचारी आणि दुचाकीस्वारांचे असल्याचे चिंताजनक वास्तव परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण ‘ट्रॅफिक स्कूल ऑन व्हील्स’ या फिरत्या वाहतूक शाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील चिंताजनक आकडेवारी

देशातील रस्ते अपघातांत पादचारी व दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण अत्यंत चिंताजनक असल्याचे २०२३ मधील आकडेवारीवरून स्पष्ट होते. देशात २०२३ मध्ये वर्षभरात ३५,२०३ पादचारी व ७७,५३९ दुचाकीस्वारांचा रस्ते अपघातांत मृत्यू झाला असून, दररोज सरासरी ९६ पादचारी व २१२ दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागतो. या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यातील एकूण रस्ते अपघाती मृत्यूंपैकी सुमारे २० टक्के मृत्यू पादचाऱ्यांचे, तर जवळपास निम्मे मृत्यू दुचाकीस्वारांचे आहेत.

‘ट्रॅफिक स्कूल ऑन व्हील्स’ उपक्रमाचा उद्देश

रस्त्यावर वाहतुकीचा नियम मोडणे ही केवळ कायदेशीर चूक नसून, अनेकदा एखाद्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी गंभीर बाब ठरू शकते. त्यामुळे रस्ता सुरक्षा ही केवळ पोलीस वा परिवहन विभागाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. वाहतूक नियमांचे महत्त्व केवळ दंडाच्या भीतीपोटी नव्हे, तर सुरक्षेसाठी नागरिकांच्या मनात रुजले पाहिजे. या उद्देशासाठी सुरू झालेली फिरती वाहतूक शाळा विद्यार्थी, व्यावसायिक चालक व सामान्य नागरिकांना वाहतूक नियम, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादा आणि मद्यपान करून वाहन चालविण्याच्या दुष्परिणामांचे आधुनिक पद्धतीने मार्गदर्शन करणार आहे.

 ‘मला काही होणार नाही’ हा अतिआत्मविश्वास ठरतोय घातक

‘मला काही होणार नाही’ हा अतिआत्मविश्वास रस्त्यावर सर्वात मोठा धोका ठरू शकतो. मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, अतिवेगाने गाडी हाकणे, हेल्मेट न वापरणे या सवयी अपघातांना निमंत्रण देतात, असे सांगत विशेषतः तरुणांनी रस्ता सुरक्षेला आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवावा, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.

या उद्घाटन सोहळ्याला आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक, ठाणे महापौर शर्मिला पिंपळोलकर, कल्याण-डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page