महाराष्ट्र

नीट परीक्षेत १६० गुण मिळाल्यावर ६८० चा दावा महागात; विद्यार्थिनीला २५ हजारांचा दंड!

नागपूर : नीट-युजी परीक्षेत केवळ १६० गुण मिळाल्यानंतरही ६८० गुणांचा दावा करत ओएमआर उत्तरपत्रिकेच्या मूल्यमापनावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या एका विद्यार्थिनीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा दणका दिला आहे. मूळ ओएमआर उत्तरपत्रिका प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आपला दावा खोटा असल्याचे विद्यार्थिनीने स्वतः मान्य केले. या प्रकरणी न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया घालवल्याबद्दल आणि विनाकारण यंत्रणेवर संशय घेतल्याबद्दल न्यायालयाने विद्यार्थिनीच्या भूमिकेला ‘पूर्णपणे चुकीचे’ ठरवत तिची याचिका फेटाळून लावली, तसेच तिला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

नागपूरमधील एका विद्यार्थिनीने आपल्या आईमार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. १६ जुलै २०२६ रोजी राष्ट्रीय चाचणी संस्थेने जाहीर केलेल्या गुणपत्रिकेत तिला ७२० पैकी केवळ १६० गुण मिळाले होते. मात्र, हा निकाल मनमानी असून प्रत्यक्ष ओएमआर उत्तरपत्रिकेतील उत्तरांचे योग्य मूल्यमापन झाले नसल्याचा दावा तिने केला होता. आपल्याला ७२० पैकी सुमारे ६८० गुण मिळण्याची अपेक्षा असल्याचा दावा करत तिने मूळ ओएमआर उत्तरपत्रिका सादर करून फेरमोजणीची मागणी केली होती.

ओएमआर पडताळणीनंतर उघडकीस आले सत्य

याचिका प्रलंबित असताना न्यायालयाच्या निर्देशानुसार संबंधित प्राधिकरणांनी विद्यार्थिनीला मूळ ओएमआर उत्तरपत्रिका पाहण्याची परवानगी दिली. त्यानुसार तिने प्रत्यक्ष ओएमआर तपासली आणि उत्तरतालिकेशी स्वतःची उत्तरे ताडून पाहिल्यानंतर, १६ जुलैचे १६० गुणांचे गुणपत्रक पूर्णपणे योग्य असल्याचे तिने आपल्या वकिलामार्फत न्यायालयात मान्य केले. यामुळे तिचा मूळ दावा पूर्णपणे फोल ठरला.

न्यायालयाची कडक भूमिका व दंडात्मक कारवाई

न्या. अनिल किलोर आणि न्या. रजनीश व्यास यांच्या खंडपीठाने विद्यार्थिनीच्या या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणतीही ठोस कागदपत्रे वा पुराव्याशिवाय संबंधित यंत्रणांवर कर्तव्यकसुरीचा आरोप करण्यात आल्याचे न्यायालयाने नमूद केले. सुरुवातीला ५० हजार रुपयांचा दंड आकारण्याचा विचार होता; परंतु विद्यार्थिनीचे हित लक्षात घेऊन तो २५ हजार रुपये करण्यात आला. ही रक्कम चार आठवड्यांच्या आत ‘पब्लिक वेल्फेअर अकाउंट’मध्ये जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून, या निर्णयामुळे विनाकारण खोटे दावे करून न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्यांना कठोर संदेश मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page