महाराष्ट्र

‘रेड्स’ ॲपची राष्ट्रीय दखल; रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांचा देशपातळीवर गौरव!

रत्नागिरी : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कौतुकास्पद वापर करून पोलीस तपासाला नवी दिशा देणारे रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची अत्यंत प्रतिष्ठित अशा ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेत भारतातील प्रथम पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाली आहे. बगाटे यांच्या संकल्पनेतून व दूरदृष्टीतून साकारण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण ‘RAIDS’ (रेड्स) या मोबाईल ॲपचे प्रभावी सादरीकरण हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये करण्यात आले होते. त्यांच्या या नाविन्यपूर्ण कार्याची आता राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.

काय आहे ‘RAIDS’ ॲप आणि त्याचे कार्य?

अज्ञात, बेवारस मृतदेहांची ओळख पटवणे तसेच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे हे पोलीस दलापुढील नेहमीच मोठे आव्हान असते. यावर मात करण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘RAIDS’ प्रणाली विकसित करण्यात आली. या प्रणालीमध्ये अज्ञात व बेवारस मृतदेहांची सर्व माहिती एकत्रित संकलित केली जाते. मृतदेहाची अवस्था खराब किंवा कुजलेली असल्यामुळे चेहरा ओळखणे कठीण होते, अशा प्रकरणांमध्ये उपलब्ध छायाचित्रे व माहितीच्या आधारे AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चेहऱ्याची संभाव्य डिजिटल प्रतिकृती पुनर्निर्मित केली जाते. याशिवाय, बेपत्ता व्यक्तींच्या अचूक शोधासाठी एकाच चेहऱ्याची १०८ विविध रूपे तयार करून तांत्रिक पद्धतीने शोधमोहीम राबवली जाते.

ॲपच्या माध्यमातून उल्लेखनीय यश

या अत्याधुनिक प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत १५३ बेवारस मृतदेहांची नोंद करण्यात आली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील १३५ कुजलेल्या व बेवारस मृतदेहांचे चेहरे एआय तंत्रज्ञानाने तयार करण्यात आले. त्यापैकी १४ प्रकरणांमध्ये मृतदेहांची ओळख यशस्वीपणे पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. याशिवाय जिल्ह्याबाहेरील १९ बेवारस मृतदेहांपैकी ७ प्रकरणांची यशस्वी उकल या ॲपमुळे झाली आहे. तसेच प्रणालीमध्ये नोंद असलेल्या एकूण ३८१ बेपत्ता व्यक्तींपैकी जिल्ह्यातील ११ जणांच्या चेहऱ्यांच्या डिजिटल प्रतिकृती तयार करून त्यांचा शोध घेण्यात आला आहे. तंत्रज्ञानाचा मानवीय आणि संवेदनशील वापर करून दाखवणाऱ्या या यशस्वी उपक्रमामुळे रत्नागिरी पोलीस दलाचा नावलौकिक देशपातळीवर पोहोचला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page