शिरूर पोलीस ठाण्याला लाचखोरीचे ग्रहण? दोन हवालदार, दोन लाच प्रकरणे; एकाला अटक, दुसरा लाच स्वीकारून फरार

पुणे, विशेष प्रतिनिधी : एकाच शिरूर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस हवालदारांविरोधात अवघ्या एका दिवसाच्या अंतराने लाच प्रकरणांत कारवाई झाल्याने पोलिस ठाण्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका प्रकरणात ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर पोलीस हवालदार सतीश नाथाराव मुंढे हा अंधाराचा फायदा घेत पळून गेला, तर दुसऱ्या प्रकरणात ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार शिवाजी ज्योतीराम बनकर (ब. नं. २४३६) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
गुन्ह्यात मदतीसाठी एक लाखांची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार शिरूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तक्रारदार आणि त्याच्या कुटुंबीयांना अटक न करण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्याच्या बदल्यात हवालदार सतीश नाथाराव मुंढे याने एक लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती.
तक्रारीच्या पडताळणीनंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर ९५ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. त्यानुसार ३० सप्टेंबर रोजी टाकळी हाजी पोलीस चौकी येथे एसीबीने सापळा रचला.
पंचांसमक्ष मुंढे याने तक्रारदाराकडून ९५ हजार रुपये स्वीकारले. मात्र, एसीबीच्या पथकाची चाहूल लागताच त्याने अंधाराचा फायदा घेत लाचेची रक्कम घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
दुसऱ्या हवालदाराकडून १५ हजारांची मागणी
याच शिरूर पोलीस ठाण्यातील हवालदार शिवाजी ज्योतीराम बनकर (वय ४४, ब. नं. २४३६) याच्याविरोधातही लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे आली होती. तक्रारदार आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात दाखल गुन्ह्यात त्यांना अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी बनकर याने १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. यापूर्वी तक्रारदाराकडून चार हजार रुपये स्वीकारल्यानंतर उर्वरित रकमेची मागणी करण्यात आली होती.
११ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
३० सप्टेंबर रोजी जुन्या शिरूर पोलीस ठाण्याजवळ एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराकडून ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बनकर याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याला त्याच दिवशी रात्री ताब्यात घेण्यात आले.
या दोन्ही प्रकरणांत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
एकाच ठाण्यात दोन कारवाया; वरिष्ठांसमोर प्रश्न
एकाच पोलीस ठाण्यातील दोन हवालदारांविरोधात लाच मागणी आणि स्वीकारल्याप्रकरणी एसीबीची कारवाई झाल्याने शिरूर पोलिस ठाण्याच्या कामकाजाबाबत चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, एका प्रकरणात लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर संबंधित हवालदार घटनास्थळावरून पळून गेल्याचे समोर आले आहे. दोन स्वतंत्र प्रकरणांतील एसीबी कारवाईमुळे शिरूर पोलीस ठाण्याला ‘लाचखोरीचे ग्रहण’ लागले आहे, का असा सवाल उपस्थित होत आहे.



