एमपीएससी आंदोलनाला राजकीय वळण?; मुरलीधर मोहोळांचा सवाल

विशेष प्रतिनिधी | महाराष्ट्र मिशन
पुणे : एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय वळण मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आंदोलन पुन्हा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित करत, सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतरही आंदोलनाचा मार्ग का स्वीकारला, असा सवाल केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले असून, एमपीएससीच्या सचिवांची बदली तसेच अध्यक्षांच्या संदर्भात घटनात्मक प्रक्रियेनुसार चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे मोहोळ यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले होते, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसह काही मागण्या अद्याप प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांचा एक गट आंदोलनावर ठाम आहे. आंदोलनाच्या ठिकाणी विविध राजकीय नेत्यांची उपस्थिती वाढत असल्याने या प्रश्नाला राजकीय रंग चढत असल्याचे चित्र आहे.
मोहोळ यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकार चर्चेस तयार असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी भूमिका मांडली. त्यामुळे सरकारची आश्वासने आणि विद्यार्थ्यांची प्रलंबित मागणी यांच्यातील संघर्षाबरोबरच आंदोलनाच्या राजकीय हस्तक्षेपाचाही मुद्दा आता चर्चेत आला आहे.



