पिंपरी-चिंचवड

चाकणच्या वाहतूक कोंडीवर तातडीचा उपाय; ५० महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तैनात

पुणे : चाकण औद्योगिक परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ५० जवान प्रमुख चौक आणि कोंडीच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांना वाहनांची वर्दळ नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ मिळाले असून, औद्योगिक परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यावर भर देण्यात आला आहे.

सध्या चाकण विभागात २० आणि महाळुंगे विभागात ३० जवान कार्यरत आहेत. वाहतूक पोलिसांसोबत समन्वय साधून प्रमुख मार्गांवरील कोंडी कमी करणे, वाहनांची हालचाल सुरळीत ठेवणे आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करणे, अशी त्यांची जबाबदारी आहे. सध्या एकाच सत्रात काम सुरू असून पुढील टप्प्यात वेगवेगळ्या वेळांनुसार मनुष्यबळ तैनात करण्याचे नियोजन आहे.

दोन लाखांहून अधिक वाहनांची रोजची वर्दळ

चाकण औद्योगिक पट्ट्यात दररोज दोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा होते. यामध्ये अवजड मालवाहू वाहने, औद्योगिक कंपन्यांच्या बसेस आणि कामगारांची वाहने मोठ्या प्रमाणात आहेत. सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत याच वाहतुकीचा ताण वाढत असल्याने लांबच लांब रांगा लागतात.

कोंडीसोबत रस्त्यांच्या प्रश्नावरही कारवाई

वाहतूक कोंडी केवळ मनुष्यबळ वाढवून सोडविण्याऐवजी रस्त्यांवरील खड्डे, अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणे, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि रस्ते रुंदीकरण या प्रश्नांवरही प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चाकण परिसरातील परिस्थितीचा आढावा घेत संबंधित यंत्रणांना तातडीने कृती आराखडा राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, चाकणच्या वाहतूक व्यवस्थेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वाहतूक नियंत्रण, सीसीटीव्ही आणि बुद्धिमान वाहतूक व्यवस्थापन प्रणाली उभारण्याचीही योजना आहे. तसेच चाकणच्या रस्ते, नाले आणि इतर पायाभूत सुविधांसाठी मोठ्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तातडीच्या उपायांसाठी तैनात केलेले जवान आणि आगामी पायाभूत सुविधा प्रकल्प यामुळे चाकणची वाहतूक कोंडी कितपत कमी होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page