गुन्हेगारीपिंपरी-चिंचवडपुणे शहरसामाजिक

नारायणगावात ‘काका’च्या मटक्याचा उच्छाद! खाकीच्या नाकाखाली गोरगरिबांच्या संसाराची राखरांगोळी; नवनियुक्त आयजी रंजनकुमार शर्मा कारवाई करणार का?

नारायणगाव (पुणे), विशेष प्रतिनिधी : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आणि जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या कायद्याचे धिंडवडे उडवले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात जुगारावर कायदेशीर बंदी घातली असली, तरी नारायणगावात मात्र अनेक मटका जुगार अड्डे खुलेआम आणि बिनदिक्कतपणे सुरू आहेत. या जुगार अड्ड्यांमुळे परिसरातील शेकडो गोरगरिबांच्या संसाराची राखरांगोळी होत असून, स्थानिक पोलीस प्रशासन मात्र ‘बघ्याची भूमिका’ घेत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नारायणगाव परिसरात सध्या ‘काका’ नावाचा कथित मटका किंग कमालीचा सक्रिय झाला असून, त्याच्याच छत्रछायेखाली हे अवैध धंदे जोमात सुरू असल्याची चर्चा आहे.

नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल करणारे प्रमुख चार मटका अड्डे खालीलप्रमाणे राजरोसपणे सुरू आहेत:

अड्डा क्र. १: नारायणगाव बस स्टँडसमोरील ‘टकसन हॉटेल’ असलेल्या गल्लीत हा अड्डा राजरोसपणे चालवला जातो.

अड्डा क्र. २: कुरेशी मार्केटमधील एका बंदिस्त गाळ्यात अत्यंत गुप्तपणे परंतु मोठ्या प्रमाणावर हा जुगार खेळवला जातो.

अड्डा क्र. ३: मच्छी मार्केट शेजारी असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये दिवसभर जुगाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

अड्डा क्र. ४: आळेफाटा रोडला असलेल्या एका नामांकित बारच्या मागील बाजूस, चायनीज सेंटरच्या शेजारी हा चौथा अड्डा थाटण्यात आला आहे.

संसाराची होळी आणि घरगुती हिंसाचारात वाढ

झटपट पैसे मिळवण्याच्या नादाला लागून परिसरातील शेकडो तरुण, मजूर आणि गोरगरीब नागरिक या मटक्याच्या विळख्यात अडकले आहेत. कष्टाची कमाई जुगारात गमावल्यामुळे मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, घरात खाण्यापिण्याचे वांधे होत आहेत. परिणामी, या भागात कौटुंबिक कलह आणि घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.

कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा; पोलिसांवर संशयाची सुई?

या अड्ड्यांवर दररोज हजारो जुगाऱ्यांची गर्दी होत असल्याने स्थानिक भागात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वी अनेकदा पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, तरीही या अड्ड्यांवर कोणतीही ठोस दंडात्मक कारवाई झालेली नाही. त्यामुळे “राज्यात खरोखरच जुगार बंदी आहे की नाही?” आणि “या मटका किंगला स्थानिक पोलिसांचा छुपा आशीर्वाद आहे का?” असा संतप्त सवाल आता सुज्ञ नागरिक विचारत आहेत.

नवनियुक्त आयजी रंजनकुमार शर्मा यांच्याकडून अपेक्षा!

कोल्हापूर परिक्षेत्राचे नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) रंजनकुमार शर्मा यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला आहे. कडक शिस्तीचे आणि बेकायदेशीर धंद्यांचे कर्दनकाळ म्हणून त्यांची ओळख आहे. आता नारायणगावातील या खाबूगिरीवर आणि गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या मटका किंग ‘काका’वर नवनियुक्त आयजी शर्मा काय चाबूक चालवणार? नारायणगाव पोलिसांना सक्त ताकीद देऊन हे अड्डे कायमचे उद्ध्वस्त करणार का? याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page