इन्स्टाग्रामवर जाळं, टेलिग्रामवर ब्लॅकमेल; खराडी पोलिसांची बिहारमध्ये कारवाई
२२ वर्षीय तरुणाच्या आत्महत्येच्या तपासातून ऑनलाइन खंडणीचा प्रकार उघड; सात मोबाइल, लॅपटॉप आणि टॅब जप्त

पुणे : इन्स्टाग्राम आणि टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून तरुणाला ब्लॅकमेल करत ऑनलाइन खंडणी उकळल्याच्या प्रकरणात खराडी पोलिसांनी बिहारमधून दोन आरोपींना अटक केली आहे. ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून मानसिक त्रास दिल्याने २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या तपासात संबंधित तरुणाकडून विविध बँक खात्यांवर एकूण १ लाख ७७ हजार रुपये उकळल्याचे निष्पन्न झाले आहे.
खराडी पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, संबंधित तरुण ३० सप्टेंबर २०२६ रोजी घरातून निघून गेला होता. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी सकाळी खराडी येथील रिव्हरडेल सूट सोसायटीच्या इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून उडी मारून त्याने आत्महत्या केली. मृत तरुणाच्या वडिलांनी १४ ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीत, अजयकुमार भाटिया नावाच्या व्यक्तीने फोन करून ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आणि वारंवार पैशांची मागणी करून मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींचे मोबाइल लोकेशन आणि अन्य तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण केले. त्यातून संशयित आरोपी बिहारमधील गोपालगंज आणि दानापूर, पाटणा परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांचे पथक बिहारला रवाना झाले. २० ऑक्टोबर रोजी पाटणा येथे सापळा रचून आकाशकुमार संजय सिंह (वय १८ वर्षे २ महिने, रा. गोरी, ता. कुचायकोट, जि. गोपालगंज) आणि राजकुमार संपूर्ण आनंद सिंह (वय २२, रा. बिरण गड, ता. बाराहाट, जि. बांका) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी दानापूर पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक करण्यात आली.
आरोपींकडून सात वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाइल फोन, एक लॅपटॉप आणि एक टॅब असा सुमारे २ लाख २२ हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींना पुण्यात आणल्यानंतर न्यायालयाने ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
पुढील तपासात आरोपींनी ‘RVCJ INSTA’ या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करणाऱ्या मुलींच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाती तयार केली असल्याचे समोर आले. या खात्यांद्वारे मृत तरुण शिखर सक्सेना याच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर टेलिग्रामवर संपर्क वाढवून व्हिडिओ कॉलद्वारे मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवण्यात आला आणि त्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले. या रेकॉर्डिंगचा वापर करून ब्लॅकमेल करत विविध बँक खात्यांमध्ये एकूण १ लाख ७७ हजार रुपये ऑनलाइन उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले.
आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत पोलिसांनी खंडणीच्या रकमेपैकी १ लाख १४ हजार ४९८ रुपये संबंधित खात्यांमध्ये रोखून धरण्यात यश मिळवले. या प्रकरणातील आणखी संबंधित व्यक्ती, बँक खातेधारक आणि बनावट सोशल मीडिया खात्यांच्या वापराबाबत तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोजकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ७) अविनाश कुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, खराडी विभाग सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, संतोष म्हेत्रे, पोलीस उपनिरीक्षक गणेश घुले, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, गणेश गिरी, मनोज खरपुडे, श्रीकांत शेंडे, नवनाथ वाळके, संतोष लवटे, सुरज जाधव, अशोक केदार, श्रीकांत कोदे, विलास केदारी, कमलेश पाटील, अमित छबडिदार आणि महेश बोराडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. तसेच परिमंडळ ७ कार्यालयातील तांत्रिक विश्लेषणाचे काम पाहणारे पोलीस अंमलदार सुनील गंडाळ व मंगेश शेळके यांनी तांत्रिक मदत केली.
दरम्यान, अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट, व्हिडिओ कॉल किंवा ब्लॅकमेलिंगच्या धमक्यांना बळी पडू नये. ऑनलाइन खंडणीची मागणी झाल्यास पैसे पाठवू नयेत. तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन खराडी पोलिसांनी केले आहे.



