आधी गांजा तस्करीत पोलीस कर्मचारी, आता दरोडा प्रकरणात वरिष्ठ निरीक्षक निलंबित; पुणे पोलीस दलात खळबळ

पुणे : पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांशी संबंधित गंभीर प्रकरणे समोर येत असताना आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांतील एका कर्मचाऱ्याला तेलंगणात १२ किलो गांजाच्या तस्करीप्रकरणी अटक झाल्यानंतर निलंबित करण्यात आले होते. आता मार्केट यार्ड परिसरातील ३० लाख रुपयांच्या दरोड्याची नोंद ‘मिसिंग’ म्हणून केल्याचा ठपका ठेवत मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत भाऊसाहेब जगताप यांना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केले आहे. या सलग घटनांमुळे पुणे पोलीस दलातील कार्यपद्धती आणि जबाबदारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ही घटना ७ ऑक्टोबर २०२६ रोजी घडली होती. मार्केट यार्ड परिसरात रोकड घेऊन जाणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला दुचाकींवरून आलेल्या पाच जणांच्या टोळक्याने अडवले आणि त्याच्याकडील ३० लाख रुपये लुटून नेले. या घटनेची मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात ‘मिसिंग’ म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, घटनेचे गांभीर्य आणि नोंदवण्यात आलेल्या प्रकारातील विसंगती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आली.
दरम्यान, स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सॅलसबरी पार्क परिसरात एका व्यापाऱ्याला मारहाण करून त्याच्याकडील साडेचार लाख रुपयांची बॅग लुटण्याचा प्रयत्न झाला होता. व्यापाऱ्याने बॅग न सोडल्याने आणि नागरिक जमू लागल्याने आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी जबरी चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परिसरातील सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी निहाल नवनाथ अडागळे (वय १९, रा. मुंढवा) आणि यश प्रवीण सोनवणे (वय २४, रा. मांजरी) यांना अटक केली.
आरोपींची चौकशी केली असता त्यांनी मार्केट यार्ड परिसरात व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला लुटून ३० लाख रुपये चोरल्याची कबुली दिल्याचे समोर आले. त्यानंतर या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्यात आली. दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद न करता तो ‘मिसिंग’ म्हणून नोंदवण्यात आल्याने गुन्हा दडपण्याचा प्रकार (बर्किंग) झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात गंभीर स्वरूपाची चूक केल्याचा ठपका ठेवत विश्वजीत जगताप यांचे वर्तन बेशिस्त आणि बेजबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच त्यांच्या वर्तनामुळे शिस्तप्रिय पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन होत असल्याचे निरीक्षण नोंदवत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
३० लाखांच्या दरोड्याची नोंद चुकीच्या प्रकारे केल्याचे प्रकरण समोर आल्याने पुणे पोलीस दलात या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे. या दरोड्यातील अन्य आरोपींचा शोध आणि संपूर्ण गुन्ह्याच्या तपासाबाबत पुढील माहिती महत्त्वाची ठरणार आहे.



