बोईसर येथील सामुहिक आदिवासी विवाह सोहळ्यात २०१ आदिवासी जोडप्यांचा विवाह

बोईसर : शिवसेनेच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी युवक युवतींचा सामूहिक विवाह सोहळा गेली अनेक वर्षे आयोजित केला जातो. यावर्षी या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना व्हिडीओ कॉल करून त्यांच्याशी संवाद साधला.
बोईसरमधील शिवसेना आदिवासी समाज विभाग आणि आधार प्रतिष्ठान यांच्यावतीने दरवर्षी बोईसर मध्ये या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सामुदायिक विवाह सोहळ्यात २०१ आदिवासी जोडप्यांचा विवाह संपन्न होत आहे ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मला या सोहळ्याला प्रत्यक्षात उपस्थित राहून तुम्हा सर्वांना भेटायचे होते मात्र, काही कारणामुळे मला माझा हा नियोजित दौर रद्द करावा लागला. म्हणून मी तुमच्याशी या व्हीडीओच्या माध्यमातून संवाद साधत असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवणे हे शिवसेनेच्या रक्तातच आहेत.आजचा हा सामुहिक विवाह सोहळा त्याचेच प्रतिक आहे.लग्न कार्यासाठी अनेक जण कर्ज काढतात. जमीन गहाण ठेवतात. हे कर्ज फेडता फेडता वधू पित्याचे कंबरडे मोडते. मात्र या गोरगरीबांना सहाय्य करण्यासाठी शिवसेनेसह पालघरमधील सामाजिक संस्थांनी भव्य सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलाय. हा सोहळा तुम्ही त्यांना वैवाहिक आयुष्यात लागणारे सर्व साहित्य देता, तसेच सर्व विधी पार पाडून घरातील सदस्यांप्रमाणे त्यांचे लग्न लावून देता, यानिमित्ताने सगळे आमदार, खासदार पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहता हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी शिवसेना उपनेते जगदीश धोडी यांनी शिंदे यांचे आभार मानले. तसेच २०२३ साली या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असता आदिवासी कन्यादान योजनेचा निधी १० हजारांचा वाढवून २५ हजार करण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला होता. त्याचा लाभ अनेक आदिवासी महिला भगिनींना होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.



