गुन्हेगारीपुणे शहरशैक्षणिकसामाजिक

गुरुवार पेठेत जुगार अड्डे जोमात; काही भ्रष्ट पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

विशेष प्रतिनिधी

पुणे : जुन्या पुण्यात जुगार धंद्यांनी पुन्हा धूमाकूळ घातला आहे. गुरुवार पेठेत २ ते ३ जुगार अड्ड्यांवर दिवसभर आणि अपरात्री सुध्दा झटपट पैसा कमावू पाहणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. झटपट पैसा कमावण्याच्या नादात शेकडो लोक लाखो रुपये गमावत आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.

शहराच्या जुन्या परिसरात, खडक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुरुवार पेठेत जैन मंदिराच्या परिसरात अड्डा चालवला जात असून वेताळ बाबा मंदिरा शेजारी राजरोसपणे जुगार अड्डा सुरू आहे. महात्मा फुले मंडई जवळील नेहरू चौकातील बोंबील मार्केटजवळ एका बिल्डिंगमध्ये जुगार अड्डा चालवला जातो, असे सांगितले जाते‌. या शिवाय शाहू चौक, गणपती मंदीरा पासून हाकेच्या अंतरावर जुगार अड्डा सुरू आहे.

खडक ठाण्याच्या पोलिसांची या धंद्यांकडे ‘अर्थपूर्ण ‘ डोळेझाक आहे. हद्दीत कोणते अवैध धंदे सुरू आहेत याची बारकाईने माहिती पोलिसांना असते. पोलीस अधिकारी आणि काही भ्रष्ट कर्मचारी हप्ता वसूल करुन काही माहिती नाही असे दाखवतात. त्यामुळे असे धंदे करणाऱ्यांचे फावले आहे असे माहितगारांचे म्हणणे आहे.

शिवाजी रोडवर, अकरा मारुती कोपऱ्याजवळ एकेकाळी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मात्र सामसूम असून फडगेट चौकी व खडक पोलीस ठाणे जवळच असल्याचा परिणाम असल्याचे सांगितले जाते.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शहरात सुरू असलेले बेकायदेशीर धंदे मोडून काढण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर आदेश दिले होते. तरीही काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांमुळे शहरात अनेक ठिकाणी जुगार,मटका सुरू आहे. झटपट पैसा कमावण्याच्या नादात शेकडो लोक लाखो रुपये गमावत आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. वेतनाशिवाय भरपूर पैसा कमावणाऱ्या पोलिसांना काळ्या पैशांची हाव असल्याने त्यांना याची जाणीव नाही.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्वतः या विशेषतः खडक पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांची दखल घेऊन खास पथकातर्फे जुगार अड्ड्यांवर कठोर कारवाई करुन सराईत गुन्हेगारांना जबर अद्दल घडवावी आणि शेकडो लोकांचे उध्वस्त होणारे संसार वाचवावेत अशी मागणी पीडितांच्या वतीने करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page