कवीकट्टा’ च्या प्रमुखपदी राजन लाखे

पुणे : येत्या १, २, ३, ४ जानेवारी २०२६ रोजी सातारा येथे होणा-या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘कवीकट्टा’ च्या प्रमुखपदी महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष, लेखक कवी राजन लाखे यांची निवड झाली आहे. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून ते दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या साहित्य संमेलनापर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळून कविकट्टा यशस्वी केलेला आहे.
पिंपरी येथे झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविकट्टा व्यासपीठावर १०२४ कवींना, कविता सादरीकरणाची संधी मिळवून देऊन साहित्य क्षेत्रात त्यांनी विक्रम प्रस्थापित केला आहे. लाखे हे महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चे तथा अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे चे अध्यक्ष असून कविता, ललित, संपादकीय, तसेच बालसाहित्य विभागात त्यांची ९ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा “बकुळगंध” हा शान्ता शेळके जन्मशताब्दी ग्रंथ, मराठी साहित्य विश्वात नाविन्यपूर्ण ग्रंथ ठरला असून या ग्रंथाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झाली आहे.
सातारा येथे होणा-या कवीकट्ट्याची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र,बृहन्महाराष्ट्र तसेच परदेशातून कविता येण्यास सुरुवात झाली आहे अखिल भारतीय कविकट्टा निवेदनाच्या अधीन असलेल्या अटीनुसार कविता पाठवण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०२५ आहे.



