महाराष्ट्र मिशन विशेष लेख – मरणाची ट्रॅफिक

महाराष्ट्र मिशन विशेष लेख
पुणे शहरात २३ अपघाती ठिकाणांवर (ब्लॅक स्पॉट) वारंवार अपघात होतात. अनेक महिने हे सुरू आहे. निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. अपघात झाला की उपाययोजना सुचवायला सुरुवात होते. या ठिकाणांवर गेल्या सव्वादोन वर्षांत ६७० अपघातांमध्ये ७०३ जणांचा बळी गेला. एक हजार २९ अपघातांमध्ये एक हजार १७३ जण जखमी झाले. या साऱ्या लोकांच्या कुटुंबियांचे काय हाल झाले असतील? यातील बहुतांश लोक कुटुंब चालवणारे कर्तेधर्ते असतील. त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक विपत्तीची कुऱ्हाड कोसळली असेल. या साऱ्या गोष्टींना कोणी जबाबदार आहे की नाही? खरे तर असे अपघात सामूहिक निष्काळजीपणाचे परिणाम असतात. त्यात स्थानिक प्रशासनही असतेच. बेशिस्त वाहनचालक तितकेच जबाबदार.
वाहतूक पोलिसांनी नेहमी अपघात होणारी २३ ठिकाणे निश्चित केलीत. अशा ‘ब्लॅक स्पॉट’ची संख्या वाढून २३ वरून ३९ पर्यंत जाईल. हडपसर-सासवड रस्ता, शिवाजीनगर भागात संचेती चौक, वारजे भागात माई मंगेशकर रुग्णालय, वारजे तील मुठा नदीपूल, डुक्करखिंड, कात्रज-कोंढवा रस्त्यावरचा खडी मशीन चौक, येरवडा भागात संगमवाडी पार्किंग, मुंढव्यात रेल्वे पूल, सिंहगड रस्त्यावर भूमकर चौक, नवले पूल, नगर रस्त्यावर टाटा गार्डन चौक, वाघोली, लोहगाव भागात ५०९ चौक, नगर रस्त्यावर खराडी जकात नाका, कात्रज चौक, बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगदा, दरी पूल परिसरात सतत अपघात होतात.
काही अपघात वाहनचालकांकडून नियमांचे पालन न केल्यामुळे होतात. परंतु रस्त्यांची परिस्थिती, रस्त्यांवर रात्री अंधार असणे अशीही काही प्रमुख कारणे आहेत. सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक सर्वाधिक असताना कुठलाही रस्ता सुरक्षित राहिलेला नाही. सिग्नल असेल अशाही चौकातून पादचाऱ्यांना तर जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. कारण पोलीस आजूबाजूला नाही असे पाहून सुसाट वेगाने दुचाकी किंवा चारचाकी वाहने सिग्नल ब्रेक करत असतात. त्यांना इतकी मरणाची घाई का असते ? दुसऱ्याच्या जीवाची पर्वा न करता गाड्या चालवणाऱ्या अशा मुजोर लोकांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कठोर होत पाऊले उचलली नाहीत, जरब बसेल अशी कारवाई केली नाही तर काही खरे नाही.
पुण्यात रस्ते, पुलांची बांधणी ही शास्त्रीयदृष्ट्या कितपत योग्य आहे, हेही तपासण्याची वेळ आली आहे. अशा तपासणीची उशीरा का होईना अक्कल आली, पुणे विद्यापीठाजवळचा संपूर्ण उड्डाणपूल पाडून टाकण्याची वेळ आली यातच सारे आले. याचाच अर्थ सरकार किंवा स्थानिक प्रशासन जे काही करेल ते शंभर टक्के बरोबर असत नाही असाही आहे. या असल्या चुकांमुळे अपघात होऊन गेलेले जीव परत येणार आहेत का?
सन २०२० मध्ये शहरातील १३५ अपघातात १४३ जण दगावले. २०२१ मध्ये २३९ अपघात २५५ जण बळी पडले. २०२२ च्या नोव्हेंबर पर्यंत २८२ अपघातात २९३ जणांचा मृत्यू झाला. यातल्या किती अपघातांचा तपास होऊन दोषींवर कारवाई झाली हा प्रश्न आहे. जखमी होऊन हात पाय कायमचा गमावलेल्या किंवा पंगुत्व आलेल्या लोकांची संख्या हजारावर आहे. ही आकडेवारी जोपर्यंत शहराचे प्रशासन चालवणाऱ्या राजकारणी आणि अधिकाऱ्यांना अस्वस्थ करत नाही तोपर्यंत पुण्याची वाहतूक नियंत्रणापलिकडे गेली आहे असे म्हणणे भाग आहे. की त्यांचे जवळचे आप्तमित्र अशा अपघातांचे बळी होत नाहीत तोवर सुधारणा होणार नाही,असा प्रश्न सामान्य लोकांना पडत असतो,तो खोटा नाही.
पुणे म्हणजे स्मार्ट सिटी हा नुसताच गाजावाजा करण्यात येतो. शहरातील मध्यवर्ती भागामध्ये त्या मानाने वाहतुकीवरचे पोलिसांचे नियंत्रण बरे म्हणावे असे आहे. मात्र उपनगरीय वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत.
संभाव्य अपघात टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलिस, आरटीओ, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम या विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
‘शाॅर्ट कट’ म्हणून प्रवाही वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने जाणारे दुचाकीस्वार, तीनचाकीवाले किंवा चार चाकी चालवणारे बेशिस्त लोक कात्रज ते वडगाव भागात नेहमी दिसतात. राष्ट्रीय महामार्गालगतही वाहतुकीच्या अस्ताव्यस्तपणाचा कहर असतो. काही महाभाग तर पोलिसांच्या देखत सिग्नल ‘जंप’ करतात. सिंहगड रस्त्यावर वडगाव फाटा ते विठ्ठलवाडी आणि ह्यूम पाईप कंपनी समोरील सिग्नल ते प्रयेजा सिटीकडे जाणारा रस्ता अशा भागात राॅंग साईडने जाणे हाच नियम बनला आहे. या रस्त्यावर उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असल्याने ट्रॅफिक वाॅर्डन नेमले आहेत, मात्र त्यांच्या देखत राॅंग साईडने जाणारे जात असतात. ट्रॅफिक वाॅर्डन फक्त पाहत राहतात. बेशिस्त, बेमुर्वतखोर आणि उद्दाम वाहनचालक शिस्तीत वाहन चालवणाऱ्याच दमदाटी करतात, हे भयंकर आहे.
चांगले हवामान, मुबलक पाणी यामुळे पुणे शहरामध्ये राजस्थान, बिहार,उत्तर प्रदेश, गुजरात तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सोलापूर, उस्मानाबाद, लातूर,नगर, नागपूर, अमरावती, जळगाव आदी ठिकाणांहून दरवर्षी हजारो जणांचे लोंढे गेलेल्या दोन दशकांमध्ये आले. त्यामुळे वाहनांच्या संख्येत सुध्दा बेसुमार वाढ झाली. रस्ते अपुरे पडतील अशी मोठमोठाली वाहने सैराट फिरु लागली. मेट्रो रेल्वे सुरु झाली खरी,पण तिला मिळणारा तोकडा प्रवासीवर्ग ही बाब चिंतेची झाली आहे.
एखाद्या व्हीआयपीचा दौरा असेल तेव्हा दक्ष होत वाहतूक सुरळीत करणारी यंत्रणा संपूर्ण रस्त्यावर तैनात करण्यात येते. व्हीआयपी सुरक्षित आणि सुखरूप आल्या वाटेने जातो. तशीच दक्षता सामान्य माणसाच्या, प्रवाशांच्या वाट्याला कधी येईल की नाही? तोपर्यंत सामान्य माणसे अशीच चिरडून मरत राहणार , मरणाची वाहतूक हे पुण्याचे चित्र असणार हे निश्चित.



