शिरूरमध्ये पूर्ववैमनस्यातून थरार: कर्डे घाटात गोळीबार करत सराईत गुन्हेगाराची हत्या

शिरूर :पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कर्डे घाटात ४ ते ५ अज्ञातांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एका सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्ती हा सराईत गुन्हेगार असून पूर्ववैमनस्यातून किंवा टोळीयुद्धातून (Gangwar) हा हल्ला झाला असावा, असा संशय पोलिसांना आहे. हल्लेखोरांनी कर्डे घाटात दबा धरून बसत पीडितांवर अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली असून पथके रवाना करण्यात आली आहेत. भरदिवसा घडलेल्या या थरारामुळे शिरूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.



